लहानपणापासून साधनेची ओढ असणारी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील ५७ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. ओवी रवींद्र पेडणेकर (वय ५ वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ओवी रवींद्र पेडणेकर हि या पिढीतील एक आहे !

माघ कृष्ण प्रतिपदा (१३.२.२०२५) या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिला ५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद ! 

चि. ओवी पेडणेकर

‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. ओवी रवींद्र पेडणेकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२५ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.१.२०२५)


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१. जन्म ते ३ वर्षे

१ अ. ग्रंथावरील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहाणे : ‘चि. ओवी प.पू. गुरुदेवांना ‘प.पू. आबा’, असे म्हणते. ती २० दिवसांची असतांना तिच्या डोक्याजवळ ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथावरील गुरुदेवांच्या छायाचित्राकडे मान वळवून बघत रहायची. त्या वेळी तिचे शरीर धनुष्यासारखे वळलेले असायचे.

१ आ. स्वभावदोषांवर स्वयंसूचना दिल्याने चि. ओवी हिच्यात झालेले पालट 

१ आ १. बोट चोखायची सवय सुटणे : ओवी ३ मासांची असल्यापासून तिला तोंडात बोट घालून चोखायची सवय लागली होती. ती अगदी रात्री झोपेतसुद्धा बोट चोखायची. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या; पण तिची ती सवय सुटत नव्हती. ओवी पावणे दोन वर्षांची असताना एकदा तिच्या आजीने (आईची आई सौ. विशाखा म्हात्रे यांनी) सुचवल्याप्रमाणे ती अर्धवट झोपेत असतांना मी तिला स्वयंसूचना देण्यास आरंभ केला. त्यानंतर हळूहळू तिची ती सवय सुटली. त्या वेळी स्वयंसूचना देण्याचे गांभीर्य आम्हा सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही तिच्या इतर स्वभावदोषांवर सूचना देण्यास आरंभ केला. या प्रक्रियेला ओवी चांगला प्रतिसाद देते.

सौ. रेवती पेडणेकर

१ आ २. वडिलांचे बाहेरगावी जाणे स्वीकारणे : गेल्या ३ वर्षांपासून आम्ही लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे स्थलांतरित झालो आहोत. तेव्हा ओवी २ वर्षांची होती. माझ्या यजमानांना कामानिमित्त अधूनमधून मुंबईला जावे लागते. ओवीची तिच्या बाबांशी अधिक जवळीक असल्याने ते मुंबईला गेल्यावर तिला पुष्कळ वाईट वाटायचे आणि ती पुष्कळ रडायची; परंतु त्याविषयी तिला स्वयंसूचना दिल्यापासून तिने त्यांचे मुंबईला जाणे मनापासून स्वीकारले आहे.

१ इ. आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर भाव जागृत होणे : ओवी अडीच वर्षांची असतांना वर्ष २०२१ मध्ये ओवीची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. तेव्हा आम्ही घरी तिचे औक्षण केले. आजी ओवाळत असतांना ओवीचा भाव जागृत झाला होता. तिला ‘आध्यात्मिक पातळी घोषित झाली म्हणजे काय ? आपल्याला औक्षण का करत आहेत ?’, यातले काहीच ठाऊक नसतांना तिची अकस्मात् भावजागृती झाली.

१ ई. सेवा करण्याची आवड : ती ३ वर्षांची असतांना आमच्या घरी ‘सनातन आकाशकंदील’ बनवण्याची सेवा होती. ती सेवा करण्यासाठी आमच्या घरी पुष्कळ साधक आले होते. तेव्हा तिने सेवेच्या कालावधीत कोणताही त्रास दिला नाही. ‘वस्तूंना अनावश्यक हात लावणे, साहित्याची ओढाओढ करणे किंवा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करणे’, अशा सर्वसाधारण मुलांमध्ये दिसणार्‍या किंवा सेवेत अडथळा आणणार्‍या कोणत्याच अयोग्य कृती तिने केल्या नाहीत. उलट ती ‘कागदाचे छोटे तुकडे उचलणे, रिकामी खोकी उचलणे, फेव्हीकॉलच्या रिकाम्या डब्या गोळा करणे’, या सेवा करायची. ती आकाशकंदील काळजीपूर्वक एका जागी रांगेत लावून ठेवायची.

२. वय ४ ते ५ वर्षे

२ अ. प्रेमभाव : जेव्हा मला कंबरदुखीचा त्रास होतो, तेव्हा ‘आई, तुझी कंबर दुखते का ? तुला तेल लावून देऊ का ?’, असे ती मला स्वतःहून विचारते.

२ आ. आईला साधनेत साहाय्य करणे 

१. ओवी मला घरकामात साहाय्य करते, तसेच सेवांमध्ये सहभागी होते. तिला सत्संगाला जायला आवडते. तेथे ती कोणताही त्रास न देता एका जागी अभ्यास करत बसते.

२. माझ्यात ‘चिडचिड करणे, तसेच राग येणे’, हे स्वभावदोष आहेत. माझे पती श्री. रवि यांच्याशी माझा कधी वाद झाला, तर ओवी शांतपणे येऊन मला माझी चूक सांगते.

२ इ. चि. ओवी करत असलेले साधनेचे प्रयत्न

१. ओवी प्रतिदिन २० मिनिटे एका जागी बसून नामजप करते. तिचे अनेक श्लोक पाठ आहेत. घरात लावलेले रामरक्षास्तोत्र ऐकूनच ती रामरक्षा म्हणायला शिकली.

२. एकदा सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) सर्व साधकांना ‘स्वतःभोवतालचे त्रासदायक शक्तीचे आवरण कसे काढायचे ?’, हे ‘ऑनलाईन’ शिकवत होत्या. या सर्व पद्धती ओवीने योग्य प्रकारे शिकून घेतल्या. तेव्हापासून प्रतिदिन ती स्वतःवरील आवरण काढते.

३. सद्गुरु स्वातीताईंनी एका मार्गदर्शनात भ्रमणभाषचा अनावश्यक वापर न्यून करण्याविषयी सूत्र सांगितले होते. घरी आल्यावर ओवीने मला सांगितले, ‘‘आई, मीही आजपासून भ्रमणभाष बघणार नाही. आपण एकमेकींना साहाय्य करूया.’’ तिचे हे सूत्र ऐकल्यानंतर तिची साधनेची ओढ माझ्या लक्षात आली

४. ओवी स्वतःच्या चुकांचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करते. तिच्याकडून झालेल्या चुकांविषयी ती क्षमायाचना करते आणि चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करते. ती प्रतिदिन रात्री प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करते.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ

२ ई १. जेवतांना नेवैद्य दाखवल्यावर ती म्हणते, ‘‘प.पू. आबा, तुम्ही खा. मग मला द्या.’’

२ ई २. ‘परम पूज्य आपल्याकडे कधी येणार ?’, असे ती मला प्रतिदिन विचारत असते.

२ ई ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी त्यांना पाहून भावजागृती होणे : वर्ष २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी प.पू. गुरुदेव दोन्ही मातांच्या समवेत (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत) रथातून आम्ही बसलेल्या ठिकाणाजवळ आले. तेव्हा ओवी हात जोडून उभी राहिली. त्या वेळी तिची भावजागृती होऊन तिच्या डोळ्यांतून पाणी येत होते. प.पू. गुरुदेव दृष्टीआड होईपर्यंत ती त्यांच्याकडे पहात होती.

 उ. ओवीला झालेले आध्यात्मिक त्रास आणि त्यांवर केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय 

१. पूर्वी ओवीला सतत दृष्ट लागायची. ती अधिक माणसांमध्ये गेली की, घरी आल्यावर रात्री रडायची. दृष्ट काढल्यावर तिचा त्रास न्यून व्हायचा. आता या त्रासात बरीच घट झाली आहे.

२. दीड वर्षाची असल्यापासून तिला सर्दीचा त्रास चालू झाला. प्रतिदिन ती सर्दीमुळे त्रस्त असायची. ‘तिचा तो त्रास न्यून व्हावा’, यासाठी ‘तिच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला जप करणे’, असे उपाय चालू होते. गेल्या तीन मासांत माझा समष्टी सेवेतील सहभाग वाढल्यापासून तिचा हा त्रास न्यून झाल्याचे माझ्या लक्षात आले.’

– सौ. रेवती रवींद्र पेडणेकर (चि. ओवी हिची आई), लांजा, जिल्हा रत्नागिरी. (१२.७.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck  मार्गिकेवरही पाहू शकता.

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक