‘एकदा कु. अपाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकण्यासाठी उपस्थित राहिली होती. ती दैवी बालकांचा सत्संग घेते. तिला आलेल्या श्री भवानीदेवीच्या संदर्भातील अनुभूती तिने सत्संगात सांगितल्या. त्या येथे दिल्या आहेत. यातून अपालाची साधनेची ओढ आणि प्रगल्भता दिसून येते.


१. कर्तेपणा सहजतेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करणारी कु. अपाला औंधकर !
परात्पर गुरु डॉ. आठवले : अपाला दैवी बालकांचा सत्संग घेते.
कु. अपाला औंधकर : आपणच सूक्ष्मातून उपस्थित राहून तो सत्संग घेता. मी काहीच करत नाही, गुरुदेव.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हिचे एकेक वाक्य कसे असते ना !

कु. अपाला औंधकर : आज सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या दोघीही आहेत. या दोघीही आदिशक्तिस्वरूप आहेत, तरीही त्या आज सत्संगात आल्या आहेत आणि आपणही आहात. मला आलेल्या श्री भवानीदेवीच्या काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे सांगू इच्छिते.
२. अपालाने सांगितलेल्या अनुभूती
२ अ. स्वतःची आई दूर असूनही श्री भवानीदेवीला आत्मनिवेदन करत असतांना ‘आई जवळच आहे’, असे जाणवणे : माझी आई मला रामनाथी आश्रमात पोचवून घरी गेली. तेव्हा मला तिची पुष्कळ आठवण येत होती. मी याविषयी श्री भवानीदेवीला आत्मनिवेदन करत होते. तेव्हा मला ‘आई जवळच आहे’, असे जाणवले.
२ आ. आई बनवत असलेल्या खाद्यपदार्थांची आठवण येणे, श्री भवानीदेवीच्या समोर बसून नामजप करतांना जिभेवर वरणभाताची चव येणे आणि ‘देवीने वरणभात भरवला’, असे जाणवणे : एकदा मला माझी आई माझ्यासाठी जे खाद्यपदार्थ बनवायची, त्यांची पुष्कळ आठवण येत होती. मी भवानीदेवीच्या दर्शनासाठी गेले होते आणि मी तिच्यासमोर बसून नामजप करत होते. तेव्हा अकस्मात् माझ्या जिभेवर वरणभाताची चव आली. त्या वेळी ‘देवीनेच मला भरवले’ असे वाटले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली की, ‘आई बनवत असलेल्या भोजनाची मला आठवण येत होती, तर भवानीमातेने मला वरणभात भरवला.’
२ इ. नृत्याचा सराव करून झाल्यावर पाय पुष्कळ दुखणे आणि श्री भवानीदेवीच्या समोर बसून नामजप अन् आत्मनिवेदन केले असता पाय दुखणे थांबणे : एक आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धा होती. त्यात मला नृत्य सादर करायचे होते. तेव्हा नृत्याचा सराव करून माझे पाय पुष्कळ दुखत होते. एकदा तर मला चालताही येत नव्हते. त्या वेळी मी श्री भवानीदेवीच्या मूर्तीसमोर गेले आणि नामजप करून तिला आत्मनिवेदन केले. त्यानंतर मी जेव्हा उठले, तेव्हा माझे पाय जराही दुखत नव्हते. मी धावत पुन्हा नृत्याचा सराव करण्यासाठी गेले. तेव्हा मला एवढी कृतज्ञता वाटली की, ‘श्री भवानीदेवीने स्वतः येऊन माझ्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या दिव्य स्पर्शामुळे माझे पाय दुखणे नष्ट झाले. अनिष्ट शक्तींचा अडथळा नष्ट झाला.’ त्या वेळी ‘भवानीमातेची माझ्यावर किती कृपा आहे !’, हे माझ्या लक्षात आले.
२ ई. श्री भवानीदेवीशी मुलीप्रमाणे असलेले अनोखे नाते अनुभवता येणे : नऊ मास होऊन गेले. मला श्री भवानीदेवीप्रती भाव जाणवतो; मात्र आता मला श्री भवानीदेवीच्या संदर्भात अनुभूती येत नाहीत. आता मला अधिकतर भगवान शिव आणि भगवान विष्णु यांच्या संदर्भात अनुभूती येतात. प.पू डॉक्टर, आपणच मला असा विचार दिला, ‘आईच्या गर्भात बालक असते, तशी मी भवानीदेवीच्या कृपाछत्राखाली ९ मास होते. या ९ मासांत देवीमातेने मला पुष्कळ शिकवले. माझ्या नातेवाईकांचा माझ्या साधनेला असलेला विरोध श्री भवानीदेवीच्या कृपेमुळे न्यून झाला आहे. मी आता आश्रमात राहून साधना करू शकते. ९ मास झाल्यानंतर देवी आता मला शिकवत आहे, ‘सर्व देवता एकच असतात. कुणामध्येच अडकायचे नाही.’ तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली की, ‘माझी आणि मातेची नाळ तुटली; मात्र माझे देवीशी असलेले मुलीचे नाते तसेच आहे. ‘मी तिची मुलगीच आहे’, असे अनुभवले.
आज साक्षात् मातेचीच सगुण रूपे सत्संगात आहेत. त्यामुळे मला आलेल्या या अनुभूतींविषयी सांगितले. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मोठ्यांचे सत्संग कसे असतात ? काय अर्थ आहे त्यात ? या मुलांना हे सर्व कुणी शिकवले ? ‘तळमळ असली, तर भगवंत कसा आतून शिकवतो आणि साधनेत पुढे पुढे घेऊन जातो !’, हे लक्षात येते.
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |