‘हिमालयातील संत-महात्म्यांचा काही उपयोग आहे का ?’ – छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचे हिंदुद्वेषी विधान !

छगन भुजबळ

नाशिक – हिमालयात पुष्कळ संत-महात्मे आहेत. त्यांचे काय करायचे ? त्यांचा काही उपयोग आहे का ? मला सांगा, असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी येथे आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात केले होते. या विधानावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे ! – तुषार भोसले, आध्यात्मिक आघाडी, भाजप

श्री. तुषार भोसले

काही साधू-संत समाजात राहून कार्य करतात, तर काही साधू-संत समाजाच्या कल्याणासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या आणि साधना करतात. भुजबळांसारखे समाजाच्या जिवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला आणि पुतण्याला आमदार-खासदार करण्यासाठी करत नाहीत. अहो भुजबळ, तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्याकडे नीट बघा.

‘साधू-संत प्रबोधनाचे कार्य करतात आणि तेच सर्वांना दिशा देतात’, असे प्रत्युत्तर कृषी आणि माजी सैनिक कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी छगन भुजबळ यांना दिले !

संपादकीय भूमिका 

आज जगभरातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या आहेत, तर काही संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतावर अनेक आक्रमणे झाली; मात्र याही स्थितीत समाज, तसेच हिमालयात वावरणार्‍या साधू-संतांमुळे भारतीय संस्कृती टिकून आहे, तसेच भारताचे अस्तित्वही अबाधित आहे. भुजबळ पुरोगामी असल्याने त्यांना साधू-संतांच्या योगदानामागील अध्यात्मशास्त्र कळेल, अशी अपेक्षाच नाही. या साधू-संतांमुळेच भारत विश्वगुरु होऊ शकतो आणि हीच भारताची खरी ओळख आहे; मात्र केवळ पुरोगामित्व मिळवणार्‍या भुजबळांना हे काय कळणार ?