Mahakumbh Dharm Sansad : राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा धर्मसंसदेत प्रस्ताव पारित

प्रयागराज कुंभपर्व २०२५

  • शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत मांडला होता प्रस्ताव  

  • मनुस्मृतीवर केलेल्या टीकेविषयी मागितले स्पष्टीकरण

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हिंदूंचा अवमान केल्याविषयी क्षमा मागण्याचेही केले  आवाहन

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

प्रयागराज – मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ‘राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचे एका मासात स्पष्टीकरण द्यावे’, असेही धर्म संसदेत सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधातही प्रस्ताव देण्यात आला. अवैधपणे अमेरिकेत राहणार्‍या हिंदूंना देशातून बाहेर केले; परंतु त्यांना हिंदु धर्मात वर्ज्य असलेले पदार्थ खायला दिल्याच्या आरोपामुळे ट्रम्प सरकारने क्षमा मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.


हे ही वाचा → संपादकीय : बहिष्कृताचे शस्त्र !


राहुल गांधी यांनी काय विधान केले होते ?

राहुल गांधी यांनी लोकसभेतील एका भाषणात हाथरस सामूहिक बलात्कार घटनेचा उल्लेख करत म्हटले होते, ‘ज्यांनी बलात्कार केला, ते बाहेर फिरत आहेत आणि मुलीचे कुटुंब आपल्या घरात बंद आहे. मुलीचे कुटुंब बाहेर जाऊ शकत नाही; कारण गुन्हेगार त्यांना धमकावतात.

मुलीच्या अंतिम संस्कारालाही अनुमती दिली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी याविषयी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर खोटे सांगितले. राज्यघटनेत कुठे लिहिले आहे की, बलात्कार करणारे बाहेर फिरतील आणि जिच्यावर बलात्कार झाला ती आणि तिचे कुटुंबीय घरातच राहतील ? हे तुमच्या मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे, राज्यघटनेत नाही.’