संपादकीय : बहिष्कृताचे शस्त्र !

राहुल गांधी आणि शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

१३ जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे. आतापर्यंत ४५ कोटी भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे. अद्यापही महाकुंभाचे १५ दिवस शेष आहेत. या काळात आणखी किमान १० कोटी भाविक स्नान करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदूंची धर्माविषयीची ही शक्ती संपूर्ण जग पहात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अत्यंत योजनाबद्धरित्या या महाकुंभमेळ्याचे नियोजन करून एक संन्यासी कसा कारभार करू शकतो ?, याचे उदाहरण केवळ देशासमोर नाही, तर जगासमोर दाखवून दिले आहे. संत, साधू, महंत, संन्यासी यांना तुच्छ लेखणारे, त्यांची हेटाळणी करणारे यांची बोलती बंद झाली आहे. त्यातही काही विघ्नसंतोषी लोकांनी चेंगराचेंगरी घडवून आणल्याने ३० जणांचा मृत्यू झाला. ही चेंगराचेंगरी एक षड्यंत्र होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी त्याच दिशेने संशयाची सुई जात आहे. लवकरच याचा खुलासा होईल. महाकुंभ हिंदूंचा सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव आहे. यासाठी कुणाकडून वर्गणी घेतली जात नाही कि कुणाला निमंत्रण दिले जात नाही. शेकडो वर्षांपासून हिंदू ठरलेल्या काळानुसार येथे येतात आणि स्नान करून निघून जातात. त्याच वेळी हिंदूंचे संत, धर्माचार्य, शंकराचार्य आदी हिंदूंच्या संदर्भातील अडचणी, त्यावरील उपाय, हिंदूंना मार्गदर्शन यांवर चर्चा करतात. गेल्या काही कुंभमेळ्यांपासून हे अधिक प्रमाणात दिसून आले आहे. आताच्या महाकुंभामध्ये अनेक संत, महंत आणि त्यांच्या संस्था यांनी धर्मसंसद, हिंदु अधिवेशन आदींचे आयोजन करून हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. काही दिशा आणि धोरणे घोषित केली आहेत. याच अनुषंगाने ‘ज्योतिष पीठा’चे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आयोजित केलेल्या धर्मसंसदेत काँग्रेसचे नेते, तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव संमत केला, तसेच ‘राहुल गांधी यांनी त्यांनी केलेल्या टीकेचे एका मासात स्पष्टीकरण द्यावे’, असेही धर्मसंसदेत सांगण्यात आले आहे. हा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मनुस्मृतीच्या विरोधात केलेल्या विधानावरून मांडण्यात आला होता. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती, तसेच त्यांच्या पूर्वीचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी भाजपविरोधी भूमिका घेतलेली दिसून आली आहे. त्याचा लाभ अप्रत्यक्षरित्या काँग्रेसला होईल, असे दिसून येत होते. आता त्याच काँग्रेसच्या नेत्याच्या विरोधात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी अशा प्रकारचा प्रस्ताव संमत केल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातही शंकराचार्यांकडून अशा प्रकारचा प्रयत्न प्रथमच होत असल्याचे दिसून आले.

हिंदु धर्माची परंपरा नाही !

हिंदु धर्मानुसार कधी कुणाला धर्मातून बहिष्कृत करण्याची परंपरा नाही. तसे धर्मशास्त्रातही म्हटलेले नाही. पूर्वीच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने पारंपिरक सामाजिक कायद्यांचे उल्लंघन केले किंवा अयोग्य वर्तन केले, तर त्याला समाजाच्या इतर सदस्यांपासून वेगळे केले जात होते, तसेच गावाचे नियम पाळले नाही, तर त्याला गावातून बहिष्कृत करण्याची परंपरा होती. यातून ‘त्या व्यक्तीला तिने केलेल्या चुकांची जाणीव होईल’, असा विचार होता; मात्र राहुल गांधी यांच्या संदर्भातील निर्णय घेतांना नेमका कोणता अभ्यास करण्यात आला, हे समजू शकलेले नाही. मुळात अनेक जण ‘राहुल गांधी हिंदूच नाहीत’, असेही म्हणत आहेत. त्यामुळे त्यांना धर्मातून बहिष्कृत कसे केले जाणार ? याविषयी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कागदोपत्री पुरावे पडताळावे लागतील. येथे विषय बहिष्कृताचा आहे. जर शंकराचार्य नवी परंपरा निर्माण करत असतील, तर त्याचा विचार करणे आवश्यक आहे. अन्य ३ पीठांचे शंकराचार्य, धर्माचार्य, संत यांचेही मत घेतले पाहिजे, अशी मागणी केली जाऊ शकते. सध्याच्या प्रकरणात हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या संदर्भात काळानुसार शिक्षा करण्याच्या संदर्भात बहिष्कृताचा प्रयत्न करत असेल, तर त्याला कुणी विरोध करण्याची शक्यता नाही. काँग्रेसमध्ये मोहनदास गांधी यांचा उदय झाल्यापासून काँग्रेसच्या माध्यमातून हिंदु धर्माचे वाईट दिवस चालू झाले आणि ते आजही चालू आहेत. त्यातूनच राहुल गांधी मनुस्मृतीचा अवमान करत आहेत. ज्या पुस्तकामुळे जगात जिहादी आतंकवाद निर्माण झाला आहे, त्याविषयी देशातील एकही निधर्मी आणि पुरो(अधो)गामी कधी तोंड उघडून बोलत नाही; मात्र तेच लाेक गेली अनेक दशके भारतात मनुस्मृतीचा द्वेष करत आहेत. अनेकदा तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. पुस्तक जाळल्याने त्यातील विचार नष्ट होत नसतात, हे अशांना ठाऊक नाही. यातून त्यांच्या बुद्धीची क्षमता किती आहे, हे लक्षात येते. त्यातही राहुल गांधी यांची प्रतिमा देशातील प्रत्येक व्यक्तीला ठाऊक असल्याने त्याविषयी बोलणेही अनावश्यक आहे, असेच वाटते. ‘हिंदु धर्माची हेटाळणी अन्य धर्मियांपेक्षा हिंदु धर्मीयच अधिक करत असल्याने आणि कायद्यानुसार अशांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने जर बहिष्कृताचे शस्त्र कुणी उचलत असेल, तर काय हरकत आहे ?’, असा प्रश्न कुणीही विचारेल. आता या बहिष्कृताची व्याप्ती कशी असणार ? हे शंकराचार्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना बहिष्कृत केल्यावर त्यांच्यावर कोणती बंधने येणार, हे समजू शकलेले नाही. त्यांना यापुढे मंदिरांमध्ये, तीर्थक्षेत्री जाता येणार नाही, असे असेल, तर ते केवळ निवडणुकांच्या वेळीच हिंदूंच्या मतांसाठी मंदिरात जातात, असे आतापर्यंत दिसून आले आहे. राजकीय द्वेषामुळे ते अयोध्येतील श्रीराममंदिरात किंवा काशी विश्वनाथाच्या दर्शनाला कधीच गेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. अशा व्यक्तीवर कोणती बंधने घातली की, तिला हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येईल ? असा प्रश्न पडतो.

 कायद्यानुसार कारवाई हवी !

हिंदु धर्माचाच नव्हे, तर कोणत्याही धर्माचा, धर्मग्रंथांचा, देवतांचा कुणी अवमान करत असेल, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याकडे सरकारने लक्ष केंद्रित केले पाहिजे. हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्लील चित्रे रेखाटल्यावर १ सहस्र २५० तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती आणि ते देश सोडून कतार देशात पळून गेले अन् तेथेच त्यांचा मृत्यू झाला. हे भारतीय लोकशाहीसाठीचे चांगले चित्र नाही. अन्य धर्मीय अशा अवमानाच्या संदर्भात कायदा हातात घेतात, तसा हिंदू घेत नाहीत. सरकारने अशा हिंदूंचा कायद्यावरील विश्वास टिकून रहाण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा बहिष्कृताच्या घटना वाढू लागल्यास समाजात वेगळा असंतोष निर्माण होऊ शकतो.

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांवर कठोर कायद्यानुसार तात्काळ कारवाई होण्यासाठी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !