नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रहित

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडल्याचे प्रकरण !

पिंपरी (पुणे) – भगवानगडाचे महंत ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराडशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडल्याने मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शास्त्री यांचे देहूतील भंडारा डोंगर येथे होणारे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय ‘श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट’ने घेतला आहे.

याविषयी अखंड मराठा समाजाने भंडारा डोंगर ट्रस्टला पत्र देऊन शास्त्री यांचे कीर्तन रहित करण्याची मागणी केली होती, तसेच तळेगाव एम्.आय.डी.सी. पोलिसांनीही शास्त्री यांचे कीर्तन आयेजित केल्यास मराठा समाजाकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पत्र भंडारा डोंगर ट्रस्टला दिले. त्यानंतर ट्रस्टने शास्त्री यांचे सहकारी ह.भ.प. विष्णुपंत खेडकर यांच्याशी चर्चेअंती शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. माघ शुद्ध दशमी दिवशी डो. सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे.