अनेक महिने देयक मिळत नसल्याने ७ केंद्रचालकांकडून शिवभोजन बंद !

अहिल्यानगर – वर्ष २०२० मध्ये चालू केलेल्या शिवभोजन योजनेच्या अनुदानात गेल्या ५ वर्षात कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक महिने देयक मिळत नसल्याने ही योजना चालवणे चालकांना परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ७ केंद्रचालकांनी शिवभोजन केंद्र बंद केले आहे. जिल्ह्यात आता ३९ केंद्रे राहिली असून त्याद्वारे ४ सहस्र ५२५ थाळ्या वितरित होत आहेत. ग्रामीण भागातील गरीब लोक, विद्यार्थी यांची आवश्यकता ओळखून नागरिकांना एक वेळचे जेवण स्वस्तात मिळावे यासाठी शिवभोजन योजना चालू केली होती. राज्यशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत ही योजना चालू केली होती.

खानावळ, भोजनालय, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट यांना ही योजना राबवता येते; मात्र शासनाचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने केंद्रचालकांना शिवभोजनाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात केंद्रचालक शिवभोजन योजना चालवण्यास इच्छुक नाहीत. ग्रामीण भागात १९ केंद्रे, तर शहरी भागात २० केंद्रे कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या कालावधीत प्रतिमास शिवभोजनचालकांना अनुदान मिळत होते; मात्र त्यानंतर अनुदान मिळण्यात विस्कळीतपणा निर्माण झाला आहे.