पोलिसांनी प्रथमदर्शनी गुन्हा रहित करण्यासाठी मठाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका

कवळे मठाधिशांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे प्रकरण

पणजी, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – कवळे मठाचे स्वामी शिवानंद सरस्वती यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. या याचिकेत स्वामींनी त्यांच्या विरोधात फोंडा पोलीस ठाण्यात नोंद झालेला प्रथमदर्शनी गुन्हा (‘एफ्.आय.आर्.’) रहित करावा, अशी मागणी केली आहे.

कवळे मठाचे स्वामी शिवानंद सरस्वती आणि अन्य २ जणांच्या विरोधात कवळे मठाचे अनुयायी तथा प्रख्यात न्युरोसर्जन डॉ. पी.एस्. रामाणी आणि मुंबई येथील मठाचे अनुयायी भूषण जॅक यांनी फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीत ‘मठाची फोंडा तालुक्यातील भूमी विकतांना योग्य मान्यता न घेणे, बनावट स्वाक्षरी करणे, उच्च न्यायालयाने संमत केलेल्या नियमांचा भंग करणे आणि मुंबई येथील धर्मादाय आयुक्त यांना अंधारात ठेवून व्यवहार करणे’, असा ठपका ठेवण्यात आला होता. फोंडा पोलिसांनी फसवणुकीवरून गुन्हा नोंद केला होता. या याचिकेविषयी अधिक माहिती देतांना मठाच्या अधिवक्त्या सलोनी प्रभुदेसाई म्हणाल्या, ‘‘मठाच्या वतीने अधिकृतपणे रहित करण्यात आलेल्या विक्री खताचे प्रकरण तब्बल ६ वर्षांनी पुन्हा उकरून काढण्यात आले आहे. सध्या मठाच्या समितीच्या निवडणुका होणार असल्याने आणि यामुळेच या प्रकरणाचा लाभ घेण्यासाठी एका धार्मिक संस्थेला अपकीर्त करण्यात येत आहे. न्यायालयाचा निवाडा येईपर्यंत या प्रकरणी पुढील अन्वेषण न करणे, आरोपपत्र प्रविष्ट न करणे आणि अन्य कोणतीही कारवाई न करणे, असा आदेश फोंडा पोलिसांना द्यावा, अशी मागणी गोवा खंडपिठात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने हे म्हणणे ऐकून गोवा सरकार आणि अन्य प्रतिवादी यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी २६ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.’’