भारतमातेची आरती

आज ‘प्रजासत्ताकदिन’ (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने…

जय देवी जय देवी जय भारतमाते
तव चरणी जनता ही नतमस्तक होते ।। धृ. ।।

पू. किरण फाटक

भाग्यवान जन्माला, आलो मी येथे ।
माणुसकीच्या धर्मा, जनता ही जपते ।।

धर्म-जाती प्रेमाने, नांदती या येथे ।
तव गुण वर्णन करता, मन तल्लीन होते ।। १ ।।

कितीतरी वीर शूर होऊनिया गेले ।
कितीतरी राष्ट्रभक्त, हुतात्मा येथे झाले ।।

छत्रपती शिवबाने अन्याया संपवले ।
झाशीच्या राणीचे शौर्य विश्व गाते ।। २ ।।

कविता टागोरांची जगद्वंद्य ठरते ।
सूर लता आशाचे, जगास मोहवते ।।

संगीत योगा जगास, आनंदही देते ।
कुष्ठरोगी सेवा करती बाबा आमटे ।। ३ ।।

गुण गाता तव माते, भाषाही थकते ।
जग हे सारे माते, पूजन तव करते ।।
राष्ट्रप्रेम जनतेच्या, हृदयी धगधगते ।
लवून करतो सलाम, तुजला मी माते ।। ४ ।।

चालीरिती किती बोली, सामावून घेते ।
विविधता असूनही, एकतेस जपते ।।
संकट येता रक्षण करीन मी माते ।
सारे माझे जीवन, अर्पिन मी माते ।। ५ ।।

– (पू.) किरण फाटक, शास्त्रीय गायक, डोंबिवली. (२४.१.२०२५)