महिलादिन विशेष . . .

महिलादिन केवळ म्हणण्यापुरतेच आहे महिलांना स्वातंत्र्य ।
पण खरेतर महिलांभोवती आहे अटी आणि बंधनांचे जणू पारतंत्र्य ।। १ ।।
आरंभच होतो गर्भापासून, करतात स्त्रीभ्रूण हत्येचे पातक ।
त्याचे कुणालाच नसते खरेच सुवेर आणि सुतक ।। २।।
सगळीकडे दिसतात मोठाले फलक ‘मुलगी वाढवा, मुलगी शिकवा’ ।
वास्तवात पहाता पैशांअभावी मुलींच्या शिक्षणाची वानवा ।। ३ ।।
शाळा, विद्यालयात असते नेहमीच मुलींचे स्थान प्रथम ।
अहो म्हणून कुणी मुलांना मानत नाहीत, दुय्यम ।। ४ ।।
समाजात मुले मोकाट सुटून करू शकतात गैरवर्तन ।
मुलींना शिकवा शीलरक्षणासाठी स्वसंरक्षण ।। ५ ।।
महिलांच्याच पोटी जन्म घेतलेला पुरुष करतो अत्याचार आणि छळ ।
पण त्याला ठाऊक नसते महिलांचे दुर्गारूपी बळ ।। ६ ।।
आजपर्यंत कार्यालयामध्ये पुरुष होते ‘बॉस’ ।
महिला ‘बॉस’ असल्यास; मात्र पुरुषी अहं दुखावतो खास ।। ७ ।।
अहो घरातसुद्धा महिलाच महिलांना देत नाहीत साथ ।
सासू-सुनेत कायमच होत असतो तू-तू, मी-मी वाद ।। ८ ।।
विवाहाच्या बाजारात सध्या नवर्यामुलींअभावी आली आहे अवकळा ।
सगळेच नवरे मुलगे बसले हातात घेऊन खुळखुळा ।। ९ ।।
मी तर म्हणतेय घरोघरी, दारोदारी एकच डंका पिटा ।
महिला झाल्या पाहिजेत सक्षम आणि बेडर ।। १० ।।
तरच आणि तरच महिलादिन साजरा करण्याचा होईल खरा उपचार ।
अन्यथा प्रतिवर्षीप्रमाणे हा ठरू नये एक निरर्थक सोपस्कार ।। ११ ।।
– सौ. वंदना तेंडुलकर
(साभार : मासिक ‘ललना’, एप्रिल २०१७)