प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज – पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड आणि संवर्धन आवश्यक आहे. हा संदेश देशभरात पोचावा, याकरिता प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यात पुरुषोत्तम गुप्ता हे प्रयत्नरत आहेत. ‘ट्रीमॅन’ (वृक्ष पुरुष) नावाने ओळखले जाणारे पुरुषोत्तम गुप्ता यांनी महाकुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना स्वखर्चाने १ सहस्र रोपे वाटप केली आहेत, त्याचबरोबर ते पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करत आहेत.
पुरुषोत्तम गुप्ता हे मूळचे प्रयागराज येथील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्रातील ठाणे शहरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. तिथे काही मित्रांच्या साहाय्याने गेली ९ वर्षे त्यांचा वृक्ष संवर्धनाविषयी कार्य नियमित चालू आहे. दर रविवारी ते शहराच्या विविध भागांत फिरून रस्त्याच्या कडेला उपलब्ध असलेल्या जागेत रोपे लावतात. तसेच त्यांची काळजी घेण्याचेही नियोजन करतात. महाकुंभमेळ्यात भेटणार्या प्रत्येक व्यक्तीला ते किमान एक तरी रोप लावावे यासाठी प्रबोधन करत आहेत.