‘२९ आणि ३०.११.२०२३ या दिवशी पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) खेळत होते. त्या वेळी आमच्यामध्ये झालेला संवाद येथे दिला आहे. ‘आरंभी मला त्यांचे बोलणे, म्हणजे सर्वसामान्य बोलणे आहे’, असे वाटले; मात्र ‘प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बोलण्यात पुष्कळ भावार्थ आहे’, असे माझ्या लक्षात आले. केवळ५ वर्षे वय असलेल्या पू. वामन यांनी खेळतांना सहजतेने साधनेविषयी सूत्र सांगितले. नंतर पू. वामन यांचे त्यांच्या वडिलांशीही (श्री. अनिरुद्ध यांच्याशी) याविषयी बोलणे झाले. यातून संतांचे अद्धितीयत्व आणि त्यांची असामान्य प्रतिभा लक्षात येते.

१. पू. वामन आणि साधिका (पू. वामन यांची आई सौ. मानसी) यांच्यात झालेला संवाद
१ अ. पू. वामन यांनी ‘आपण जिंकलो, तर साधनेत मागे येणार आणि हरलो, तर आपण साधनेत पुढे पुढे जाणार’, असे सांगणे

पू. वामन : आपण जिंकायचे नाही. आपण नेहमी हरायला पाहिजे. आता जिंकणे, म्हणजेच हरणे आणि हरणे म्हणजेच जिंकणे आहे.
साधिका : अरे वा ! किती सुंदर आणि योग्य सूत्र आहे. मला हे सूत्र समजावून सांगणार का ? इतके महत्त्वाचे सूत्र तुम्हाला कसे बरे ठाऊक झाले ? तुम्हाला हे कोणी सांगितले ?
पू. वामन : हो. सांगतो ना ! मला काल रात्री नारायणांनी सूक्ष्मातून हे सूत्र सांगितले. ते म्हणाले, ‘आपण नेहमी हरायचे. आपण जिंकायचे नाही; कारण आपण हरतो, म्हणजेच आपण जिंकतो.’ आता हिंदु राष्ट्र आणायचे आहे ना ! मग आता हे सगळे असेच उलट-सुलट होणार.
साधिका : हो, तुमचे म्हणणे योग्य आहे; पण आपण असे कुठे कुठे हरायचे ?
पू. वामन : प्रत्येक ठिकाणी असे करायचे. आपण जिंकलो, तर साधनेत मागे येणार आणि हरलो, तर आपण साधनेत पुढे पुढे जाणार.
साधिका : मी हे सूत्र लिहून घेते. याविषयी आणखी काही सांगायचे असल्यास सांगा.
पू. वामन : आता इतकेच लिहून ठेव. नारायणांनी अजून काही सांगितले की, सांगतो.
२. पू. वामन आणि श्री. अनिरुद्ध (पू. वामन यांचे वडील) यांच्यात झालेला संवाद
२ अ. पू. वामन यांनी ‘आपण जिंकल्यास आपल्यातील अहं वाढेल आणि आपण हरलो, तर आपल्यातील नम्रता वाढून आपण नारायणांकडे जाऊ’, असे सांगणे

३०.११.२०२३ या दिवशी आम्ही गाडीने प्रवास करत असतांना पू. वामन आणि त्यांचे वडील श्री. अनिरुद्ध यांच्यात झालेला संवाद येथे दिला आहे.
पू. वामन : बाबा, एक सांगू, आपण जिंकायचे नाही, तर आपण नेहमी हरायचे.
श्री. अनिरुद्ध (पू. वामन यांचे वडील) : बरं; पण आपण जिंकलो, तर काय होईल ? आणि हरलो, तर काय होईल ?
पू. वामन : आपण जिंकलो, तर आपल्यातील अहं वाढेल आणि हरलो, तर आपण नम्र होऊन नारायणाकडे जाऊ; म्हणून आपल्याला जिंकायचे नाही. आपण जिंकलो, तर नारायणापासून दूर जाऊ.
श्री. अनिरुद्ध : तुम्ही सांगितल्यामुळे मला समजले. सेवा करतांना मला हे सूत्र लक्षात ठेवायला हवे.
पू. वामन : हो. योग्य आहे. असेच करायला हवे, तरच आपल्याकडून नारायणाची सेवा होईल आणि तरच आपली साधना होईल. जिंकणे महत्त्वाचे नाही, तर हरणेच महत्त्वाचे आहे.
३. ‘आपण जिंकायचे नाही, तर आपण नेहमी हरायचे’, याविषयी पू. वामन यांचे बोलणे योग्य असल्याच्या संदर्भातील प्रसंग
मागील काही दिवसांपासून पू. वामन ‘आपण जिंकायचे नाही, तर आपण नेहमी हरायचे’, असे दिवसभरात अनेक वेळा म्हणत असतात, तसेच एखादा प्रसंग घडत असतांना त्या संदर्भात हे सूत्र योग्य प्रकारे लागू करून मला सांगतात.
अ. आमच्या समोरच्या घरातील व्यक्तीने आमच्या घराच्या दिशेने तोंड करून दोरीने २ नरकासुराचे चेहरे बांधले आहेत. १.१२.२०२३ या दिवशी मी कपडे वाळत घालत असतांना पू. वामन मला म्हणाले, ‘‘हे बघ, यांनी आपल्याकडे तोंड करून नरकासुर बांधले; कारण त्यांना आपल्याला हरवायचे आहे. साधनेला हरवायचे आहे; पण त्यांना ठाऊक नाही की, ते जिंकणार, म्हणजे हरणार आहेत आणि आपण हरणार, म्हणजे जिंकणार आहोत. आता हे असेच होणार. तेच आपल्याला जिंकवणार आहेत. साधना कधीच हरणार नाही. हे सगळे पालट नारायणांनी केले आहेत. आता वाईट लोकांचा काळ आहे; म्हणून सर्व उलट-सुलट केले आहे. आता वाईट शक्तींचा काळ सगळा मायावी आहे, म्हणजे जे छान दिसते, ते छान नसते.’’
आ. एक दिवस आम्ही चारचाकी गाडीने बाहेर जाऊन घरी परत येत होतो. तेव्हा गाडी आत घेण्यासाठी फाटकाचे दार उघडायचे होते. त्या वेळी पू. वामन माझ्या मांडीवर बसले होते. मी दार उघडायला गाडीतून खाली उतरणार होते. अकस्मात् पू. वामन यांनी त्यांच्या वडिलांना दार उघडायला सांगितले. तेव्हा त्यांचे वडील लगेच दार उघडण्यासाठी खाली उतरले. त्या वेळी पू. वामन मला म्हणाले, ‘‘बाबा हरले, म्हणजे ते जिंकले. ते लगेच दार उघडायला गेले नसते, तर ते जिंकले असते; पण साधनेत मागे आले असते. आता ते हरले, म्हणजे साधनेत एक पाऊल पुढे गेले.’’
४. पू. वामन यांचे ‘आपण जिंकायचे नाही, तर आपण नेहमी हरायचे’, यासंदर्भातील बोलणे ऐकून साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
५ अ. हरणे, म्हणजे माघार घेणे : पू. वामन यांचे बोलणे ऐकून माझ्या लक्षात आले, ‘आताच्या काळात जो जिंकेल, त्याचा सततच्या जिंकण्यामुळे अहं वाढेल. ते अतिआत्मविश्वास बाळगून वागतील. त्यामुळे जिंकलेल्या व्यक्तीचे वर्तन अहंयुक्त आणि उन्मत्त होऊ शकते. परिणामी त्या व्यक्तीची अधोगती होऊ शकते. ती व्यक्ती ईश्वरापासून दूर जाते.
याउलट ज्याला विविध प्रसंगात हार पत्करावी लागेल, त्याच्यात नम्रता आणि शरणागती वाढेल. त्याला देवाचे साहाय्य मिळेल. तो नारायणाच्या दिशेने प्रवास करील. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देवच त्याचे रक्षण करील. हरणे, म्हणजे माघार घेणे ! त्यामुळे आताच्या काळात स्वतः जिंकून स्वतःतील अहं वाढवून घेण्यापेक्षा हार पत्करून (माघार घेऊन) नम्रतेने आणि शरणागत होऊन वागणे योग्य होईल.
५. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी पू. वामन यांच्या संदर्भात काढलेल्या ‘‘तुम्ही त्याला (पू. वामन यांना) शिकवायला जाऊ नका. त्याच्याकडून (पू. वामन यांच्याकडून) नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहा !’’ या उद़्गारांची साधिकेला येत असलेली प्रचीती
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, पू. वामन यांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन थोडे जरी प्रयत्न केले, तरी माझी साधना होईल. पू. वामन अंतर्मनातून सतत तुमच्या अनुसंधानात असतात. ‘ते केवळ दिसायला स्थूलदेहाने आमच्या समवेत रहातात; पण ते सूक्ष्मदेहाने सतत तुमच्या समवेत असतात’, असे मला वाटते. आपण आम्हाला पूर्वी सांगितलेले एक वाक्य आठवले, ‘‘तुम्ही त्याला (पू. वामन यांना) शिकवायला जाऊ नका. त्याच्याकडून (पू. वामन यांच्याकडून) नेहमी शिकण्याच्या स्थितीत रहा.’’ आम्ही आपल्या या उद़्गारांची प्रचीती वेळोवेळी घेत आहोत. ही केवळ आपलीच कृपा आहे.
६. कृतज्ञता
हे गुरुदेवा, आपले असामान्यत्व आपली प्रत्येक कृती आणि विचार यांतून प्रकट होते. तेच असामान्यत्व आपण घडवलेल्या संतरत्नांकडून अनुभवायला येते. आपण करत असलेल्या कृपेबद्दल आपल्याला कितीही वेळा वंदन केले, तरीही ते अल्पच आहे. ‘आपल्या चरणी कशी आणि कोणत्या शब्दांत कृतज्ञता व्यक्त करू !’, तेच कळत नाही. आपले सर्वच कार्य शब्दांच्या पलीकडील आहे. त्यासाठी आपल्या कोमल चरणी शब्दातीत कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई), फोंडा, गोवा. (६.१२.२०२३)
|