हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व सांगणारा अजरामर चित्रपट : ‘संगीत मानापमान’

हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व, राष्ट्रनिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम दर्शवणारा चित्रपट म्हणजे ‘संगीत मानापमान !’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाने ‘स्पेशल इफेक्ट्स’चा भडिमार, आत्यंतिक हिंसा, टोकाची अश्लीलता, बाष्कळ संवाद, चरित्रहीन नायक-नायिका दाखवून केवळ तिकिटविक्रीच्या आकडेवारीला महत्त्व देत समाजात उच्छृंखलतेचा प्रसार करणार्‍या चित्रपटकारांना सणसणीत चपराक दिली आहे. याविषयीची माहिती या लेखाद्वारे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

संकलक : श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर.

चित्रपटाचे भित्तीपत्रक

१. अभिनेते सुबोध भावे यांची कौतुकास्पद कामगिरी !

श्री. सागर निंबाळकर

मराठी चित्रपटसृष्टीतील एक हुशार, मराठी कलेचा सार्थ अभिमान असणारे अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणजे सुबोध भावे ! सुबोध भावे यांनी मराठी नाट्यसृष्टीत अजरामर झालेली कलाकृती ‘संगीत मानापमान’ ही चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आणण्याचे शिवधनुष्य केवळ उचलले नाही, तर ते तितक्याच सहजतेने चिरतरुण केले आहे. ‘दादासाहेब फाळके, शांतारामबापू यांच्या पठडीतील कलाकृती आजही मराठीत सिद्ध होऊ शकतात. आपण या मराठी माणसांचा वारसा समर्थपणे चालवू शकतो’, असे सुबोध भावे यांनी दाखवून दिले आहे. या त्यांच्या कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करावे, तितके अल्पच !

२. राष्ट्रप्रेमी नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीचे अद्वितीय स्थित्यंतर !  

लोकमान्य टिळक यांच्या दैनिक ‘केसरी’चे पत्रकार, दैनिक ‘नवाकाळ’चे संस्थापक-संपादक तथा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘संगीत मानापमान’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत मेनका’, ‘संगीत द्रौपदी’ अशी अनेक नाटके सिद्ध झाली. तेव्हाचा काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. त्यामुळे नाट्याचार्यांच्या नाटकांत केवळ मनोरंजन नव्हते, तर राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा हेसुद्धा ठासून भरले होते. वर्ष १९११ मध्ये ‘किर्लाेस्कर नाटक कंपनी’ने ‘संगीत मानापमान’ प्रथम सादर केले. या नाटकाची सशक्त कथा, कलाकारांचा सुमधुर ध्वनी अन् कसलेला अभिनय आणि अद्वितीय संगीत यांमुळे ते मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या नाटकाचे वैशिष्ट्य असे होते की, यातील कथानकापेक्षा गीतांना नाट्यरसिकांकडून होणार्‍या वारंवार गाण्याच्या मागणीमुळे (‘वन्समोअर’च्या) रात्री ८.३० वाजता चालू झालेले नाटक संपायला पहाटेचे ३ ते ४ वाजायचे. आज त्याच नाट्याचे सुबोध भावे यांनी अत्यंत चपखलपणे चित्रपट-माध्यमात स्थित्यंतर घडवले आहे. साडेतीन घंट्यांचे नाटक केवळ २ घंटे ३७ मिनिटांच्या चित्रकृतीत बसवतांना नाट्यमाध्यमाच्या पलीकडे जाऊन चित्रपटमाध्यमाच्या लवचिकतेचा पुरेपूर वापर सुबोध भावे यांनी यशस्वीपणे केला आहे.

३. चित्रपटाची थोडक्यात कथा 

चित्रपटाची कथा अगदी सरळ, साधी असली, तरी त्यात उच्च जीवनमूल्ये आहेत. एका छोट्याशा संग्रामपूर राज्यातील एका गावात धैर्यधर रहातो. धैर्यधरच्या वडिलांनी सैन्यात प्राण गमावले असल्याने त्याची आई त्याला सैन्यात जाऊ देत नाही. एकदा धैर्यधरने केलेल्या पराक्रमामुळे राज्याचे सेनापती त्याला सैन्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देतात; मात्र आईच्या आज्ञेमुळे तो हातात शस्त्र न घेता, सैन्यात अन्य कामे करण्याचे दायित्व स्वीकारतो. एकदा सेनापतींची मुलगी भामिनी धैर्यधरच्या आईचा एका प्रसंगात अपमान करते. सेनापतींनी समजावल्यावर ती आईची क्षमा मागते; मात्र ती धैर्यधरचीही क्षमा मागायला गेल्यानंतर तिला न पहाताच धैर्यधर तिचा अपमान करतो. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी भामिनी वेश पालटून ‘वनमाला’ या नावाने धैर्यधरच्या पथकात सहभागी होते. तेव्हा तिला राष्ट्रप्रेमी, ध्येयनिष्ठ, सुसंस्कारी अशा धैर्यधरची ओळख होते. त्यातच या संग्रामपूरचा शत्रू असलेल्या शेजारच्या राज्याचा राजा धीरेन संग्रामपूरचा उपसेनापती चंद्रविलासशी संगनमत साधून राज्य मिळवणार असतात, तो डाव धैर्यधर आणि भामिनी उलटवतात.

४. कथेत दर्शवलेली महत्त्वपूर्ण हिंदु जीवनमूल्ये !

४ अ. एका वेगळ्याच गोष्टीचा राग काढण्यासाठी भामिनी धैर्यधरच्या आईचा अवमान करते; मात्र जेव्हा तिला तिची चूक उमगते, तेव्हा ती सरळ त्या आईची आणि धैर्यधरची क्षमा मागायला जाते. ती स्वतः सेनापतीची मुलगी असूनही तिला त्याविषयी कमीपणा वाटत नाही किंवा त्याविषयी ती अहंकार बाळगत नाही.

४ आ. धैर्यधरही भामिनीचा नकळत अवमान करतो. जंगलात त्याविषयी वनमाला त्याला प्रश्न करते. तेव्हा तो सांगतो, ‘‘मलाही भामिनी यांची मनापासून क्षमा मागायची आहे. त्यांनी आईचा अवमान केल्याचे मला सहन झाले नाही; मात्र मी त्यांच्यावर राग काढणे, त्यांचा अवमान करणे, योग्य नव्हते.’’ एका न पाहिलेल्या व्यक्तीविषयीही इतका आदर केवळ हिंदु धर्मच शिकवतो !

४ इ.  सेनापतींनी भामिनीसह विवाहाचा प्रस्ताव ठेवल्यावर त्यांना धैर्यधरने नकार दिलेला असतो. त्याविषयी तो म्हणतो की, भामिनी एका सेनापतीची मुलगी आहे. साहजिकच ती सुंदर असेल, यात शंका नाही; मात्र तिचा एखाद्या माझ्यासारख्या साध्या सैनिकाशी विवाह  झाला, तर तिला आयुष्यभर अपमानास्पद जीवन जगावे लागले असते; म्हणून त्याने नकार दिला. हे किती अद्भुत आहे !

आजवर ‘लैला मजनू’, ‘हिर रांझा’ यांसारख्या हिंदी चित्रपटांनी समाजाला काय शिकवले, तर तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर आपली पात्रता न पहाता प्रेम करा आणि ते यशस्वी नाही झाले, तर मरून जा ! अशा फालतू प्रेमविरांपेक्षा धैर्यधर सहस्रो पटींनी मोठा ठरतो.

४ ई. धैर्यधर आपल्या प्रेमापेक्षा नेहमीच राष्ट्रनिष्ठेला प्राधान्य देतो. वयाची ३५ वर्षे उलटली, तरी त्याने विवाहाचा विचारही केलेला नसतो. तो राष्ट्रासाठी सैनिक होऊन सर्व प्रकारचा त्याग करण्यासाठी सिद्ध असतो. शेवटी जेव्हा त्याला समजते की, भामिनी आणि वनमाला एकच आहेत; तो स्वतःचे प्रेम, फसवणूक आदी विसरून केवळ राष्ट्राची एक नागरिक म्हणून भामिनीचे रक्षण करण्याचे वचन देतो. जीवनातील कठीण प्रसंगी देवाला प्रार्थना करणे. त्याच्या नावाने नदीपात्रात दीप सोडणे, ही प्रथा येथे अत्यंत मार्मिकपणे दशर्वण्यात आली आहे.

४ उ. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील चित्रपट असला, तरी त्यांच्या सैन्यात मुसलमानांची काही संख्या दाखवून त्यांना ‘सेक्युलर’ दर्शवण्याचा खोडसाळपणा अनेक चित्रपटांत चालू आहे; मात्र या चित्रपटाचे यासाठी कौतुक करावे लागेल की, एकही अहिंदू पात्र या चित्रपटात दर्शवलेले नाही. कुणाच्याही लांगूलचालनाचा प्रयत्न केलेला नाही. मूळ नाटकात असलेली देवतांविषयीची वाक्ये वगळलेली आहेत; मात्र कथेशी कोणतीही तडजोड केलेली नाही.

४ ऊ. या कथानकाचे सार असे आहे की, राष्ट्राशी संबंधित एखादे महत्त्वपूर्ण दायित्व देतांना एखाद्याचा जन्म कुठे झाला किंवा तो कुणाचा वारसदार आहे, हे न पहाता, त्या व्यक्तीमध्ये क्षात्रधर्म आणि राजधर्म यांना अनुसरून आवश्यक गुण आहेत का, हे पाहूनच पद दिले जावे. अहंगंड असणार्‍या पराक्रमी व्यक्तीपेक्षा राष्ट्रनिष्ठ, धैर्यशील आणि निगर्वी व्यक्तीमत्त्वच श्रेष्ठ ठरते.

५. दमदार पात्रे आणि अद्वितीय संगीत !

५ अ. या चित्रपटाची नायिका भामिनी आहे. सेनापतींची कन्या अन् रूपगर्विता म्हणून तिच्यात घरंदाजपणा असला, तरी तिच्यात उद्दामता नाही. एखाद्याचा अवमान केला, तरी संबंधिताची क्षमा मागण्याचे धैर्य तिच्यात आहे. कुणीही कान भरले, तर त्याविषयी निश्चिती झाल्याविना निर्णय न घेण्याचा शहाणपणा तिच्यात आहे. मैत्री आणि विवाह यांच्यातील भेद समजून घेण्याची परिपक्वता, जवळच्या मित्राला समजावण्याची अन् प्रसंगी कठोर होण्याची तत्त्वनिष्ठा तिच्यात आहे. मनाची निश्चिती होण्यासाठी प्रसंगी कष्ट सोसून प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची विजिगीषु वृत्ती तिच्यात आहे. सेनापतीची मुलगी म्हणून ती क्षात्रवृत्तीने निष्णातपणे तलवार अन् धनुष्यबाण चालवते; मात्र त्याच वेळी तलवार चालवण्याचे भान शिकवणार्‍याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सोज्वळताही तिच्यात आहे.

५ आ. यातील सेनापती, महाराणी, धैर्यधर ही पात्रे अत्यंत तत्त्वनिष्ठ, धर्मनिष्ठ, अचूक निर्णयक्षमता असलेली, योग्य-अयोग्य जाणणारी, राजधर्माचे वहन करणारी अशी आहेत. धैर्यधर हा आदर्श पुत्र, सतर्क नागरिक, आदर्श मित्र, आदर्श सैनिक,  प्रामाणिक व्यक्ती आणि एक उत्तम प्रियकरही आहे.

५ इ. या चित्रपटात नाट्यसंगीतावर आधारित १८ गीते आहेत; मात्र ती गीते केवळ मनोरंजक नाहीत, तर ती कथेला पुढे नेणारी आहेत. त्यामुळे त्यांचा कंटाळा येत नाही. या गीतांतून मराठी भाषेची मधुरता कानात गुंजारव करते. शंकर महादेवन आणि त्यांचे मित्र एहसान अन् लॉय यांनी जुन्या नाट्यगीताला नवा बाज देतांना त्याची सात्त्विकता अल्प होणार नाही, याची काळजी घेतली आहे. मूळ नाटकाचे संगीतकार गोविंदराव टेंबे यांच्या उच्च प्रतिभेची आणि मराठी भाषेच्या काव्य लवचिकतेच्या अप्रतिमतेची कल्पना या चित्रपटातील गीते पहातांना येते.

एका गीतामध्ये दर्शवले आहे की, चंद्रविलास हा धैर्यधर आणि भामिनीचे कान भरतांना स्वभावदोषांविषयी विवेचन करतो. दुसरीकडे सेनापतीही भामिनीची समजूत काढतांना धैर्यधराच्या गुणांचे वर्णन करतात. यामध्ये साधलेला चित्रमेळ अद्वितीय असा आहेच, याखेरीज सर्वसामान्यांना दोष आणि गुण यांतील भेदांची जाणीव करून देण्यात गीतकार, संगीतकार यशस्वी झाले आहेत, म्हणजेच हिंदु धर्मात दोष दूर करण्याला असलेले महत्त्वही स्पष्ट झाले आहे.

(क्रमशः)

__________________________________________________

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/878782.html