हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व सांगणारा अजरामर चित्रपट : ‘संगीत मानापमान’

हिंदु संस्कृतीचे अद्वितीयत्व, राष्ट्रनिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम दर्शवणारा चित्रपट म्हणजे ‘संगीत मानापमान !’ या अस्सल मराठमोळ्या चित्रपटाने ‘स्पेशल इफेक्ट्स’चा भडिमार, आत्यंतिक हिंसा, टोकाची अश्लीलता, बाष्कळ संवाद, चरित्रहिन नायक-नायिका दाखवून केवळ तिकिटविक्रीच्या आकडेवारीला महत्त्व देत समाजात उच्छृंखलतेचा प्रसार करणार्‍या चित्रपटकारांना सणसणीत चपराक दिली आहे. याविषयीची माहिती या लेखाद्वारे ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. २८ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘अभिनेते सुबोध भावे यांची कौतुकास्पद कामगिरी, कथेत दर्शवलेली महत्त्वपूर्ण हिंदु जीवनमूल्ये आणि दमदार पात्रे अन् अद्वितीय संगीत’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

संकलक : श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर. 

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/878370.html

६. अतिशयोक्ती आणि आततायीपणा टाळणे 

या चित्रपटाचे एक महत्त्वाचे सकारात्मक सूत्र, म्हणजे येथे कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती किंवा आततायीपणा दर्शवलेला नाही, हे पुढील सूत्रांवरून स्पष्ट होते.

६ अ. उपसेनापती चंद्रविलास हे पात्र पराक्रमी असले, तरी ते अहंने प्रेरित आहे; मात्र त्याच्या अहंच्या पैलूंना दर्शवण्यासाठी गीताचा आधार घेतला आहे. तो भामिनीच्या वाढदिवशी तिला महाल भेट देतो, तेव्हा त्याच्या गीतात तो भामिनीपेक्षा ‘मी कसा श्रेष्ठ आहे’, याचे गुणगान करतो. एवढ्यावरूनच त्याचा अहंगंड प्रदर्शित होतो. त्याला सध्याच्या अन्य चित्रपटांप्रमाणे स्वतःचे श्रेष्ठत्व वारंवार दर्शवण्यासाठी दाढीवरून हात फिरवावा लागत नाही. कोणताही खुनशीपणा दाखवावा लागत नाही.

६ आ. शेजारील राज्याचा राजा धीरेन हा खलपुरुष असला, तरी तो केवळ संवादातून त्याचे खलत्व अन् द्वेष प्रकट करतो. त्याच्या विचारांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा दिसते; मात्र तो गलिच्छ राजकारण करण्यासाठी अत्यंत खालच्या स्तराला जात नाही किंवा कोणताही आक्रस्ताळेपणा करत नाही.

६ इ. यात दर्शवलेली लढाईची दृश्ये तत्कालीन लढाईचे खरे स्वरूप दर्शवतात. विनाकारण ‘स्पेशल इफेक्ट’च्या माध्यमातून एक नायक २०-२५ जणांना मारतांना दर्शवलेले नाही. चित्रपट भव्य बनावा, यासाठी अतार्किक लढाईची दृश्ये यात नाहीत. शेवटची लढाईही अगदी मोजक्या काही क्षणांत संपवली असून वास्तव वाटेल, अशीच आहे. तेथे अकारण दृश्ये लांबवण्याचा मोह टाळला आहे.

६ ई. महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटात उच्छृंखलता दर्शवणारी प्रेमदृश्ये नाहीत. प्रेयसीसाठी भेट दिलेली गाडी तिने न स्वीकारल्यास ती पेटवून देणारी दृश्ये येथे नाहीत. धैर्यधर वनमालेला ‘चंद्र-तारे तोडून आणीन’, अशी आश्वासने देत नाही, तर तो जंगलात असलेल्या फुलांचे दागिने बनवून तिला देतो. त्या फुलांमुळे फुलपाखरे वनमालेकडे आकर्षित होतात आणि तिला आनंद होतो. असे अत्यंत साधेपणाचे प्रेमदर्शन यात आहे.

६ उ. सध्याच्या हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नायकाला ‘आयुष्यापेक्षा मोठी प्रतिमा’ (लार्जर दॅन लाईफ) दर्शवण्याची घाणेरडी प्रथा चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मन वास्तवापासून भरकटते. अन्य सर्व पात्रांना अगदी नायिकेलाही कूचकामी दर्शवून नायकाच्या सर्व दुर्गुणांचे उदात्तीकरण केले जाते. त्यामुळे कथानकाला महत्त्वच उरत नाही. येथे तसे नाही. येथे कथेचा नायक धैर्यधर असला, तरी सर्वच पात्रेही त्याच्याइतकीच महत्त्वाची आहेत. काही प्रसंगांत धैर्यधरालाही हरावे लागते. माघार घ्यावी लागते. तोही तुमच्या-आमच्यासारख्याच चुका करतो. भामिनीही हट्ट करते, चुकते, शिकते आणि पुढे यशस्वी मार्गक्रमण करते. परिणामी हा चित्रपट एखाद्या पात्राचा न ठरता, तो दिग्दर्शकाचा ठरतो आणि कथाच या चित्रपटाची नायक ठरते.

अभिनेत्री वैदेही परशुरामी

७. तगड्या कलाकारांचा सशक्त अभिनय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांचे कष्ट !  

या चित्रपटातील प्रत्येक पात्रासाठीच्या कलाकारांची निवड उत्कृष्ट आहे. खल पात्रेही संयत अभिनयाचे दर्शन घडवतात. सुबोध भावे, उपेंद्र लिमये, शैलेश दातार, सुमित राघवन, निवेदिता जोशी, नीना कुळकर्णी हे जुने-जाणते कलाकार यात आहेत. ते नेहमीच आपली भूमिका तन्मयतेने पार पाडतात; मात्र यातील भामिनीचे पात्र साकारतांना अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केलेल्या उत्तम अभिनयाला दाद दिली पाहिजे. वरील सर्व कलाकारांत त्या नवीन असल्या, तरी सुबोध यांनी त्यांच्याकडून अप्रतिम ‘भामिनी’ साकारून घेतली आहे. वनमालेचे पात्र रंगवतांना वैदेही यांनी ‘मेकअप’ला फाटा देऊन सुंदर अभिनयावर अन् ते पात्र जगण्यावर भर दिला आहे, हे विशेष !

८. आवाहन 

श्री. सागर निंबाळकर

सद्यःस्थितीत चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाविषयी चर्चा घडवण्याची आणि केवळ काहीशे कोटींच्या तिकिट विक्रीची घोषणा करण्याची जीवघेणी स्पर्धा चालू आहे. ३०० ते १ सहस्र कोटी रुपये व्यय असलेले अत्यंत तकलादू चित्रपट प्रेक्षकांच्या माथ्यावर मारतांना त्यातील भारतीयत्व, राष्ट्रप्रेम, न्यायशीलता, मूल्यनिष्ठा, नैतिकता यांचा तिलांजली दिली जात आहे. ‘ॲनिमल’ हा अशा पद्धतीच्या चित्रपटाचे उदाहरण आहे. यातून समाजमनावर केवळ हिंसा, प्रतिशोध, अहंगंड, अश्लीलता यांचा भडिमार केला जात आहे. अशा वेळी १० जानेवारी २०२५ या दिवशी प्रदर्शित झालेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट, म्हणजे वाळवंटातील ‘ओॲसिस’ (वाळंवटातील हिरवळीचा प्रदेश) आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् स्वाभिमानी हिंदूने हा चित्रपट पहायला हवा ! सध्या तो महाराष्ट्रात काही ठिकाणीच चालू आहे; मात्र काही दिवसांनी तो ‘ओटीटी’वर प्रदर्शित होईल, तेव्हाही तो पहाता येईल ! सर्व राष्ट्रप्रेमींनी प्रत्येक चित्रपट पहातांना त्याविषयी वरीलप्रमाणे दृष्टीकोन ठेवावा. यातून आपल्याला खरे राष्ट्र अन् धर्म प्रेमी दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांची ओळख होईल !

(समाप्त)