प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, २७ जानेवारी (वार्ता.) – सरकारने हिंदु राष्ट्राच्या मागणीचा स्वीकार करावा, कारण यामध्ये सर्वांचे हित आहे. हिंदु राष्ट्र झाल्यावर अल्पसंख्यांकांवर अत्याचार होणार नाहीत. भारत आमच्या रक्तारक्तात भिनला पाहिजे. यासाठी आम्ही केलेल्या हिंदु राष्ट्राच्या मागणीकडे सरकारने लक्ष द्यावे. यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा. हिंदु राष्ट्र जलगदगतीने झाले पाहिजे, असे परखड मत देहली येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार साध्वी प्रज्ञा भारती यांनी येथे मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साध्वी प्रज्ञा भारती यांचा सन्मान केला
साध्वी प्रज्ञा भारती यांनी हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साध्वी प्रज्ञा भारती यांचा सन्मान केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट उपस्थित होते. तत्पूर्वी हिंदु जनजागृती समितीचे मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी साध्वी प्रज्ञा भारती यांना प्रदर्शनाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची अनेक वर्षांपासून मला माहिती आहे. पूर्ण निष्ठेने सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, श्री. आनंद जाखोटिया कार्य करत आहेत.’’

साध्वी प्रज्ञा भारती म्हणाल्या,
१. आपल्या भावना हिंदु राष्ट्राशी जोडलेल्या आहेत. अनेक ख्रिस्ती आणि इस्लामी राष्ट्रे आहेत; मात्र अजूनपर्यंत हिंदूंनी हिंदु राष्ट्र पाहिलेले नाही. आम्ही हिंदु आणि सनातनी आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने जीवन जगणार आहोत. तो हिंदूंना अधिकार आहे.
२. आम्ही सरकारकडून पुष्कळ अशा गोेष्टींची मागणी केलेली नाही. ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ही भावना सरकारने समजून घेतली पाहिजे. यामध्ये भारत राष्ट्राचे हित आहे. महाकुंभाच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर चेतनेची जागृती होऊन एक संदेश जात असून हिंदूंमध्ये जागृती होत आहे.
३. जर हिंदु राष्ट्र झाले, तर भारतात किती घडामोडी घडतील ? संपूर्ण विश्व आपल्याला नमन करील. भारत एक जगाचा प्रमुख आणि जगद्गुरु म्हणून उदयास येईल; पण हे केव्हा होणार ?, तर भारत हिंदु राष्ट्र झाल्यानंतर या गोष्टी घडतील.