भेडशी-कुडासे रस्ता जलमय : शेती, बागायती यांची हानी
दोडामार्ग (सिंधुदुर्ग) – तालुक्यातील भोमवाडी, साटेली-भेडशी येथे असलेल्या तिलारी धरणाच्या कालव्याला २४ जानेवारी या दिवशी पहाटे मोठे भगदाड पडले. गेल्या वर्षी कालव्याच्या दुरुस्तीचे काम जेथे केले होते, तेथील माती वाहून गेल्याने भगदाड पडले आणि कालव्यातील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर आले. त्यामुळे साटेली, भेडशी-भोमवाडी-कुडासे या रस्त्याला नदीचे स्वरूप आले, तसेच कालव्याच्या जवळ असलेली शेती आणि बागायती यांत पाणी घुसून हानी झाली. या घटनेनंतर कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. यामुळे गोवा राज्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
संबंधितांवर कारवाई करणार ! – नितेश राणे, पालकमंत्री
सिंधुदुर्गनगरी – तिलारी धरणाचा कालवा फुटण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे शेतकर्यांची हानी झाली आहे, तसेच गोवा राज्याचा पाणीपुरवठाही बंद करावा लागला आहे. निकृष्ट कामामुळे कालवा फुटल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर आलेले पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी विचारले असता राणे यांनी, ‘निकृष्ट काम करणार्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले जाईल. या घटनेची गंभीर नोंद घेतली जाईल. आगामी काळात निकृष्ट काम करण्याचे धैर्य कोणत्याही ठेकेदाराने करू नये’, अशी चेतावणी दिली.