भारतीय ज्ञान परंपरा प्राचीन अन् आधुनिकही ! – डॉ. सचिन कठाळे

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास स्मृति व्याख्यानमालेची सांगता

डॉ. कठाळे

रत्नागिरी – भारतीय ज्ञान परंपरा प्राचीन, आधुनिक, शास्त्रीय, तसेच व्यावहारिक आहे. अंतरंग, सूक्ष्म, कुणाच्याही विरोधात नाही, सर्वस्पर्शी, कल्पनातीत, सर्वसमावेशक ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. प्राचीन काळी आयुर्वेद, योग, ज्योतिष, गणित, विज्ञान, कृषी, स्थापत्यशास्त्र, धातूशास्त्र, खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास केला होता, त्यामुळे या ज्ञान परंपरेचा अभिमान बाळगा आणि त्यात संशोधनही करा, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने कालिदास स्मृति व्याख्यानमालेचे द्वितीय व्याख्यान त्यांनी दिले. भारतीय ज्ञान परंपरा यावर त्यांनी उद्बोधक माहिती दिली.

डॉ. कठाळे पुढे म्हणाले की,

१. भारतात ३३ प्रकारची विमाने असल्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आहे. विमानासाठी लागणार्‍या वजनाने हलक्या परंतु कोणत्याही स्थितीत भंग न होणार्‍या धातूची निर्मिती त्या काळी केलेली होती.

२. कृषी ग्रंथांचा आधार घेऊन शेती केली, तर ती सर्वांचे कल्याण करणारी ठरेल.

३. लक्ष्मण मंदिरावर आक्रमण झाले. त्या वेळी मंदिराची हानी आक्रमकांना करता आली नाही. ज्या वेळी मूर्ती भंजन केली, त्या वेळी सर्व मंदिर क्षणात कोसळले. ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’चा भारतियांचा अभ्यास होता.

४. संस्कृत भाषेची स्थिती चांगली आहे, त्याविषयी कुणी चिंता करू नका. अनेक ठिकाणी संस्कृतचे स्वागत केले जाते. बेंगळुरूमध्ये प्रतिवर्षी संस्कृत शिक्षक पाहिजेत, अशा शाळा, महाविद्यालयांची विज्ञापने येत असतात. युद्धशास्त्र, जलशास्त्र, प्राणीशास्त्र, संमोहनशास्त्र, गंधशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्यावरील ग्रंथही संस्कृतमध्ये आहेत.

५. विविध प्रकारच्या चुंबकांवरील माहिती श्लोकात दिली आहे. द्रावक नावाचा चुंबक आधुनिक वैज्ञानिकांना ठाऊक नाही.
या वेळी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शिक्षण धोरणात करण्यात आला आहे. अनेकदा आपल्याला परदेशातून ज्ञान मिळाले की, त्याचे नवल वाटते; पण संस्कृतमधील भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शेकडो विषय मांडले गेले आहेत. महाविद्यालय आणि संस्था नेहमी संस्कृत प्रचार, प्रसारासाठी योगदान देत राहू.