भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे केले स्पष्ट !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देऊबा भारत दौर्यावर आल्या आहेत. त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी अनेक सूत्रांंवर चर्चा केली. यात नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ होत असलेल्या निदर्शनांवरही चर्चा झाली. जयशंकर यांनी आरजू राणा यांना स्पष्ट केले आहे की, ‘नेपाळमधील राजेशाहीच्या समर्थनार्थ चाललेल्या चळवळीत भारताची कोणतीही भूमिका नाही.’ नेपाळी निर्यातीवरील अडथळे हळूहळू अल्प करण्याचे आश्वासन भारताने दिले आहे. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्यावरही चर्चा केली.
नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी अलीकडेच नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये सहस्रो लोक जमले होते. या काळात ज्ञानेंद्र शाह यांच्या समर्थकांनी नेपाळमध्ये राजेशाही पुनर्संचयित करण्याची आणि हिंदु धर्माला पुन्हा राज्य धर्म बनवण्याची मागणी केली. जमावाने ‘राजासाठी राजवाडा रिकामा करा’ आणि ‘राजा परत या, देश वाचवा’ अशा घोषणा दिल्या होत्या.
भारत नेपाळमध्ये हस्तक्षेप करत आहे का ?
‘काठमांडू पोस्ट’च्या वृत्तानुसार काही भारतीय तज्ञ नेपाळमधील राजेशाही आणि हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ चालू असलेल्या चळवळीच्या बाजूने बोलत आहेत. नवी देहली येथे झालेल्या १० व्या ‘रायसीना संवादा’च्या वेळी नेपाळच्या परराष्ट्रमंत्री आरजू राणा देऊबा यांनी एस्. जयशंकर यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, काठमांडू अन् भारतातील काही लोक असा दावा करत आहेत की, नेपाळमधील राजेशाही आणि हिंदुत्ववादी चळवळीला भारताचा पाठिंबा आहे.
आरझू राणा यांनी जयशंकर यांना विचारले की, ‘हे दावे खरे आहेत का ?’ यावर जयशंकर यांनी स्पष्ट केले की, ‘भारत अशा कारवायांमध्ये सहभागी नाही. आमची अजिबात भूमिका नाही. भारताने नेपाळमधील राजेशाही समर्थक कारवायांपासून स्वतःला स्पष्टपणे दूर ठेवले आहे.’ भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव यांनीही असेच स्पष्टीकरण दिले आहे.
‘पंतप्रधान ओली ८ महिने पदावर असूनही त्यांनी भारताला भेट न दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले आहेत का ?’, असा प्रश्न आरजू देउबा यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, असे नाही. भारतासमवेतचे संबंध योग्य मार्गावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात सागरमाथा संवादासाठी नेपाळला भेट देऊ शकतात. भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी नेपाळकडून प्रयत्न चालू आहेत.