अब्दुल बाबांचा पैसा साई संस्थानकडे जमा करावा ! – आमदार संग्राम जगताप यांची मागणी

आमदार संग्राम जगताप

शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – येथील अब्दुल बाबांच्या समाधीवर भाविकांकडून येणारा पैसा संस्थानने जमा करावा, अशी मागणी अहिल्यानगर शहराचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. शिर्डीच्या साई समाधी मंदिर परिसरात साईबाबांच्या काळातील तात्या पाटील कोते, भाऊ महाराज कुंभार, अय्यर यांच्यासह हाजी अब्दुल बाबा अशा ४ समाधी आहेत. यांपैकी ३ समाधींवरील पैसा संस्थानच्या तिजोरीत जमा होतो; मात्र अब्दुल बाबांच्या समाधीवर जमा होणारा पैसा बाहेरचे काही लोक घेऊन जातात. हे कायदा आणि राज्यघटना यांना धरून नाही. त्यामुळे संस्थांनांनी त्याला प्रतिबंध घालावा. यामध्ये दुजाभाव करू नये. एकाला वेगळा आणि दुसर्‍याला वेगळा न्याय असे करू नये. सगळा पैसा संस्थानच्या तिजोरीत जमा झाला पाहिजे, याविषयी आम्ही साईबाबा संस्थान आणि शासनाला निवेदन देणार आहोत, अशी भूमिका आमदार जगताप यांनी मांडली आहे. ही भूमिका आणि पक्षाचे व्यासपीठ दोन्ही वेगवेगळे असल्याचा खुलासाही आमदार जगताप यांनी या वेळी केला.