
कोल्हापूर, २० जानेवारी (वार्ता.) – भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारे, भक्तवत्सल असे अनंतकोटी ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामींचा नामस्मरण सोहळा सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत १९ जानेवारीला पंचगंगा नदीच्या काठावर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. गेली ८ वर्षे चालू असलेला यंदाचा सोहळा ‘लाईव्ह’ करण्यात आला होता. त्यामुळे यात अमेरिकेतील भाविकही सहभागी होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि स्वामींच्या जयघोषात डुंबून जाणार्या या सोहळ्यात आबालवृद्धांसह सर्व स्तरातील भाविक सहभागी झाले होते. व्यासपिठावर स्वामी समर्थ, स्वामी सूत यांच्या परंपरेची माहिती देणारा सुंदर असा देखावा उभारण्यात आला होता. याचा प्रारंभ पंचगंगेच्या आरतीने करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष श्री. अरुण डोंगळे, विजयसिंह यादव, मिलिंद धोंड यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. नामजप आणि सामूहिक आरतीनंतर भाविकांना खिचडी वाटप करत या सोहळ्याची सांगता झाली. याचे नियोजन स्वामीभक्त सर्वश्री अरुण गवळी, गुरुदेव स्वामी, धनंजय महेंद्रकर, अभिजित पाटील, अमित पाटील यांसह अन्य स्वामीभक्तांनी केले होते.