बांगलादेशाची भारताच्या शत्रूविषयी मवाळ भूमिका
ढाका – बांगलादेशाच्या उच्च न्यायालयाने उल्फा आतंकवादी परेश बरुआची जन्मठेपेची शिक्षा १४ वर्षांपर्यंत न्यून केली. भारताच्या ईशान्येकडील भागात शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याविषयी दोषी आढळल्यानंतर परेश बरुआ याला वर्ष २०१४ मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या मासातच परेश बरुआची फाशीची शिक्षा न्यून करून जन्मठेपेत पालटण्यात आली होती. आता आणखी उदारता दाखवत बरुआ याच्या जन्मठेपेच्या शिक्षेचा कालावधी १४ वर्षांपर्यंत करण्यात आला आहे.
उल्फा आतंकवादी परेश बरुआ सध्या चीनमध्ये रहात असल्याचे मानले जाते. वर्ष २०१४ मध्ये बांगलादेशाच्या न्यायालयाने बरुआला त्याच्या अनुपस्थितीत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्याचे नाव भारताच्या ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) ‘मोस्ट वाँटेड’ गुन्हेगारांच्या सूचीतही आहे.
‘बी.एन्.पी.’च्या माजी मंत्र्याच्या सुटकेचा आदेश !
बांगलादेश उच्च न्यायालयाने ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बी.एन्.पी.)च्या सरकारमधील माजी मंत्री लुत्फोजमान बाबर यांनाही मुक्त केले आहे. ईशान्य भारतातील फुटीरतावादी संघटनेला शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याविषयी बाबर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.