पोलिसांकडून अन्वेषणात निष्काळजीपणा !
मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर नोंद
मुंबई – वरळी हिट अँड रन प्रकरणाच्या अन्वेषणात पोलिसांनी पक्षपातीपणा आणि निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून आरोपी मिहीर शहा याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता १०३ अंतर्गत नोंद करावी आणि अतिरिक्त आरोपपत्र प्रविष्ट करावे, अशा मागणीच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर नोंद घेतली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपिठाने पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेमुळे आरोपी मिहीर शहा याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खंडपिठाने पोलिसांना या प्रकरणी नोटीस बजावत याचिकेची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली.
सोनसाखळी चोरणारा अटकेत !
मुंबई – अल्पवयीन मुलीवर आक्रमण करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. शिकवणीवरून एकटीच घरी जात असल्याचे पाहून १७ वर्षांच्या मुलीवर आरोपीने आक्रमण केले. सोनसाखळी चोरून पळत असतांना आसपासच्या नागरिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांकडे सोपवले. या प्रकरणी आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमन गुप्ता (वय २० वर्षे) असे त्याचे नाव आहे.
‘सोलर पॅनल’ बसवल्यास मालमत्ता करात सवलत !
मुंबई – इमारती आणि आस्थापने येथे ‘सोलर पॅनल’ बसवल्यास मालमत्ता करात २ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. याविषयी महापालिका धोरणात्मक निर्णय घेणार असून त्याची कार्यवाही चालू आहे. यासाठी नगरविकास विभागाची अनुमती घेण्यात येईल.
शिर्डी विमानतळ परिसरात लेझर किरणांवर बंदी !
संगमनेर – शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायूक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत. लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात. यासाठी हा निर्णय घेण्यात आला.