शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंग यांची घोषणा बांगलादेशी नागरिकांची माहिती दिल्यास पारितोषिक !
उल्हासनगर – येथे आतापर्यंत १२ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. ‘शहरातील बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि १ सहस्र १११ रुपयांचे पारितोषिक मिळवा’, अशी घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी केली आहे.
परप्रांतियाने मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर गाडी घातली !
कल्याण – परप्रांतीय तरुणाने मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण हा प्रयत्न फसल्याने त्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोकांनी धाव घेतल्याने तो प्रयत्न फसला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘टोरेस’च्या सीईओला अटक !
मुंबई – टोरेस आस्थापन घोटाळ्याच्या प्रकरणी सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असणार्या महंमद तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली आहे. रियाजला न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका दिवसात दुधाचे १ सहस्र ६७ नमुने जप्त !
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात भेसळ करणार्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. त्याअंतर्गत राज्यात एका दिवसात दुधाचे १ सहस्र ६७ नमुने जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाईल. निकृष्ट दर्जा आणि अल्प प्रतीचे दूध याअंतर्गत हे नमुने घेण्यात आले आहेत.
‘जी.बी.एस्.’च्या रुग्णांवरील उपचाराची विशेष व्यवस्था करा ! – मुख्यमंत्री
मुंबई – गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (‘जी.बी.एस्.’च्या) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली. ‘या आजारावरील उपचार ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’त समाविष्ट आहेत. आवश्यकतेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने व्यवस्था करावी. हा आजार दूषित पाणी आणि न शिजवलेले अन्न-मांस यांमुळे होत असल्याने असे अन्न टाळावे. पाणी उकळून प्यावे.
३१ जानेवारीला पुण्यात क्रिकेटचा सामना आहे. त्या वेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी’, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.