महाराष्ट्र साधू-संतांचा कि पुरोगाम्यांचा ?

सातारा येथे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी’मध्ये २४ व्या ग्रंथ महोत्सवाला प्रारंभ झाला. या वेळी प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी ‘महाराष्ट्रातील साधू-संतांनी जी ग्रंथसंपदा निर्माण केली त्यांची पारायणे विद्यार्थ्यांनी करावीत’, असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना कृतीप्रवण केले; मात्र तेथे उपस्थित असलेल्या साम्यवादी विचारसरणीच्या लेखकांनी ‘देशाला पुरोगामी विचारांची आवश्यकता कशी आणि का आहे ?’, याचे विवेचन केले. या वेळी तेथे उपस्थित असणार्‍या विद्यार्थ्यांची स्थिती मात्र दोन्ही बाजू ऐकून गोंधळल्यासारखीच झाली असेल हे निश्चित ! ‘ग्रंथ’ आणि ‘पुस्तक’ यांतील भेद न समजण्याएवढेही महाराष्ट्रातील वाचक वेडे नसावेत ! ‘जीवन कसे जगायचे’, याचा आदर्श वस्तूपाठ पुस्तके देतात, तर साधूसंतांचे चैतन्यमय ग्रंथ ‘जीवनमुक्त कसे व्हायचे’, याची अमूल्य शिकवण देतात. राजहंस जसा नीर आणि क्षीर बाजूला सारतो, त्याचप्रमाणे वाचकाने आपल्याला जे आवश्यक ते घ्यावे अन् अनावश्यक मात्र सोडून द्यावे, हीच खरी ‘वाचनकला’ आहे; मात्र ‘ग्रंथ महोत्सवा’च्या गोंडस नावाखाली पुरोगामीत्वाचा डांगोरा पिटणार्‍या साम्यवाद्यांनी ‘महाराष्ट्राला पुरो(अधो)गामी ठरवण्याचा जणू विडाच उचलला आहे’, असे वाटते.

ग्रंथ महोत्सव, वाचन संस्कृती, वेद, शास्त्र, धर्म, नीती या शब्दांचे साम्यवाद्यांना वावडे असले, तरी याच माध्यमातून भोळ्या-भाबड्या हिंदूंना सर्रास फसवण्याचे काम ते उघडपणे करत आहेत. त्यामुळेच साधू-संतांच्या ओव्या, अभंग आणि श्लोक या माध्यमांतून आम्ही कसे अंधश्रद्धांचे निर्मूलन करतो, हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न तथाकथित पुरोगामी करत असतात; मात्र ज्या साधू-संतांनी ‘मनुष्याने हरिनाम घ्यावे’, यासाठी वेळोवेळी आर्ततेने सांगितले, ज्यांनी खर्‍या अर्थाने अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मात्र आज भोंदू ठरवले जात आहे. काही पुरोगामी संस्था विदेशी देणग्या स्वीकारत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य कसे जागतिक स्तरावर करत आहेत, हे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ हिंदु धर्माची चिकित्सा करून हिंदूंचाच बुद्धीभेद करण्याचा चंग पुरोगाम्यांनी बांधला आहे. बुद्धीभेद करण्याचे शस्त्र म्हणून हिंदु धर्मातील ग्रंथांचा उपयोग करण्यात येत आहे. ही साधू-संतांच्या महाराष्ट्राची शोकांतिकाच आहे. सत्य झाकून पुरोगामीत्वाचा विचार रुजवण्यासाठी पुरोगाम्यांचे प्रयत्न पहाता आजच्या विद्यार्थ्यांना ‘प्रगतीशील महाराष्ट्र खरोखर साधूसंतांचा आहे कि पुरोगाम्यांचा?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहाणार नाही. त्यांना योग्य दिशादर्शनाची आवश्यकता आहे.

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा