Dismantle Terror Camps : जर आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे बंद केली नाहीत, तर.. ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला चेतावणी

अखनूर (जम्मू-काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरविना जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पाकिस्तानसाठी पाकव्याप्त काश्मीर एक ‘परदेशी प्रदेश’ आहे. आतंकवादाचा व्यवसाय चालवण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरची भूमी वापरली जाते. पाकव्याप्त काश्मीरचा वापर आतंकवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी केले जात आहे. याची ठोस माहिती आमच्याकडे आहे. जर पाकने ही प्रशिक्षण केंद्रे बंद केली नाहीत, तर.., अशा शब्दांत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकला चेतावणी दिली. येथे ९ व्या सशस्त्र दलाच्या माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो बोलत होते.

पाककडून धर्माच्या नावाखाली दिशाभूल करण्याचा प्रयत्न

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना तेथील सरकारकडून सन्माननीय जीवन जगण्यापासून वंचित ठेवले जात आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून धर्माच्या नावाखाली भारताविरुद्ध दिशाभूल करण्याचे आणि चिथावणी देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

जिंकलेला प्रदेश परत केला नसता, तर आज आतंकवाद्यांची घुसखोरी झाली नसती !

मागील सरकारांच्या कार्यशैलीवर प्रश्‍न उपस्थित करत राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील हाजी पीरचा परिसर जिंकला होता. जर तो परत केला नसता, तर आज आतंकवादी तेथून घुसखोरी करू शकले नसते.

पाकला प्रत्येक युद्धात पराभवाचा सामना करावा लागला आहे !

वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धाचा उल्लेख करतांना राजनाथ सिंह म्हणाले की, युद्धभूमीवरील विजय भारतीय सैन्याच्या शौर्य, धैर्य आणि बलीदान यांचा परिणाम होता. इतिहासाकडे पाहिले, तर तुम्हाला दिसेल की, पाकिस्तानने भारतासमवेत लढलेल्या प्रत्येक युद्धात पराभव पत्करला आहे. वर्ष १९४८ मधील काश्मीरवरील आक्रमण असो, वर्ष १९६५, १९७१ चे युद्ध असो किंवा वर्ष १९९९ मधील कारगिलमधील मर्यादित युद्ध असो, पाकिस्तानला प्रत्येक लढाईत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विधान एका कटाचा भाग आहे !

पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान अन्वरुल हक यांनी जम्मू-काश्मीरमधून भारतीय सैन्याला हाकलून लावण्यासाठी पुन्हा जिहादला पुनरुज्जीवित करण्याचा उच्चार केला होता. त्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरच्या बेकायदेशीर पंतप्रधानांनी भारताविरुद्ध विष ओकले आहे. ते पाकिस्तानच्या कटाचा एक भाग आहे. जनरल झिया-उल-हक यांच्या काळापासून पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी जे भारतविरोधी धोरण अवलंबले होते, तेच धोरण अन्वरुल हक अशी वक्तव्ये करून पुढे चालवत आहेत.