दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील २ मंदिरांत सामूहिक आरती !

श्री सातेरी मंदिरात आरती करतांना विश्वस्त सुभाष राणे आणि ग्रामस्थ

दोडामार्ग – महाराष्ट्र मंदिर महासंघाची ‘मंदिर न्यास राज्य परिषद’ शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबर २०२४ या दिवशी झाली होती. या परिषदेत मंदिर रक्षणासह हिंदूंना संघटित करण्याच्या अन्य कार्यक्रमांसह मंदिरांतून सामूहिक आरती करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या परिषदेस तालुक्यातील उगाडे गावातील मंदिरांचे विश्वस्त सर्वश्री प्रवीण गवस, हिरबा राणे आणि सुभाष राणे सहभागी झाले होते. त्यांनी गावात आल्यानंतर परिषदेत ठरल्यानुसार सामूहिक आरती आणि धर्मविषयक विवेचन यांचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानुसार कृती केली. त्यानुसार श्री सातेरी मंदिरात प्रत्येक मंगळवारी रात्री ८ वाजता आणि श्री रवळनाथ मंदिरात प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता सामूहिक आरती आणि धर्मविषयक विवेचन यांना प्रारंभ करण्यात आला. या ठिकाणी गेल्या १० महिन्यांपासून सनातन संस्थेचा सत्संग चालू आहे.

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या ‘मंदिर न्यास राज्य परिषदे’त प्रत्यक्ष सहभागी करून घेतल्याबद्दल ईश्वरचरणी कृतज्ञता ! या परिषदेमुळे विश्वस्तांनी ‘साधना’ म्हणून काय केले पाहिजे, ते लक्षात आले. त्याप्रमाणे आम्ही गावात सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्हाला मंदिर महासंघाने साहाय्य करावे.

मंदिरात ‘वस्त्रसंहिता’ असली पाहिजे, हे पटले. त्यामुळे मंदिराची सात्त्विकता टिकून रहाते आणि पर्यायाने भक्तांना त्याचा लाभ होतो, हे पटले. आमच्या दोन्ही मंदिरांत आम्ही वस्त्रसंहिता लागू करणार आहोत. मंदिरातून सातत्याने धर्मविषयक जागृती झाली, तरच हिंदु राष्ट्राला अनुकूल होईल, हे या परिषदेमुळे लक्षात आले. याप्रमाणे आमच्या मंदिरांमध्ये सातत्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

– सर्वश्री प्रवीण गवस, हिरबा राणे आणि सुभाष राणे, मंदिर विश्वस्त, उगाडे