‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ
नवी मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अमली पदार्थांविरोधात मोठी लढाई लढणार आहोत. नवी मुंबईपासून चालू झालेली ही मोहीम इतरही ठिकाणी चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ८ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की,…
१. ‘नशामुक्त नवी मुंबई’ ही मोहीम चालू झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, ‘टोल फ्री लाईन’च्या माध्यमातून या संदर्भातील माहिती प्राप्त करून त्यावर कारवाई करणे, संदिग्ध असणार्यांवर कारवाई करणे आणि नव्या पिढीला अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. नवी मुंबईप्रमाणे ही मोहीम इतरही ठिकाणी चालणार आहे.
२. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमली पदार्थांच्या विरोधात मोठी लढाई चालू झाली असून महाराष्ट्रातसुद्धा आपण ती लढाई लढत आहोत.
३. आपण मोठ्या प्रमाणात तस्करांवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थांचे अड्डे निर्माण करणे चालू आहे. सामाजिक माध्यमांवर मागणी करून ते पदार्थ कुरियरच्या माध्यमातून पोचवले जातात. त्यामुळे याविरोधातही आपण मोहीम चालू केली आहे.
४. पोलीस तस्करांच्या नवीन पद्धती शोधून त्यांच्यावर कारवाई करत आहेत. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयांनी गेल्या वर्षभरात अमली पदार्थांच्या विरुद्ध विक्रमी कामगिरी केली. पंजाबप्रमाणे महाराष्ट्र आणि देशातील विविध शहरांमध्ये अमली पदार्थांचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याविरोधात आपण प्रभावीपणे कारवाई केल्यास हे थांबवू शकतो. ही कारवाई आता चालू केली आहे.