प्रयागराज कुंभपर्व २०२५
|
श्री. गिरीश पुजारी, प्रतिनिधी
प्रयागराज, ९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्यात घातपात किंवा दुर्घटना यांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अवघ्या ५ सेकंदात पर्यायी वीजपुरवठ्यासाठी सौरऊर्जा यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. सौरऊर्जेद्वारे महाकुंभमधील सर्व रस्ते आणि घाट यांवर अवघ्या ५ सेकंदांमध्ये वीज चालू होणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेश शासनाच्या अखत्यारीत येणार्या ‘पूर्वांचल विद्युत् वितरण निगम मर्यादित’चे अधीक्षक अभियंता मनोज गुप्ता यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.
मनोज गुप्ता म्हणाले, ‘‘महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमक्षेत्राच्या तिन्ही किनार्यांवर ३२ चौरस किलोमीटर भागामध्ये कुंभमेळा वसला आहे. या संपूर्ण कुंभक्षेत्रात ६७ सहस्र वीज खांब उभे करून ४ लाख ५० सहस्र वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. संपूर्ण कुंभमेळ्यात १४ किलोमीटर लांबीच्या विद्युत् वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा चालू आहे. मागील २ महिन्यांपासून कुंभक्षेत्रात वीजव्यवस्था निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. कुंभमेळ्यामध्ये प्रतिदिन ३० सहस्र किलोवॅट वीजेची आवश्यकता लागत आहे. कुंभमेळ्यात एकूण १४ मुख्य केंद्रे आणि ५० उपकेंद्रे चालू करण्यात आली आहेत. वीजव्यवस्थेसाठी कुंभक्षेत्रात ३३ शासकीय अधिकारी आणि तब्बल ५ सहस्र कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.’’
वीज खंडित झाल्यास असा होणार वीजपुरवठा !
वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीज देण्यासाठी १२५ किलोवॅटचे ८५ जनरेटर आहेत. या जनरेटरद्वारा (विद्युत् जनित्रांद्वारे) २० सेकंदांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत् होईल. मुख्य विद्युत् पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरद्वारा आपोआप वीजपुरवठा चालू होईल, अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. जनरेटरद्वारे सर्व शासकीय कार्यालये आणि मुख्य रस्ते येथे वीजेचे दिवे लागतील. जनरेटर कार्यरत होण्यामध्ये लागणारा २० सेकंदांचा वेळ भरून काढण्यासाठी सौरऊर्जेची यंत्रणा कार्यरत आहे. ही यंत्रणा ५ सेकंदांमध्ये कार्यरत होईल. यासाठी कुंभक्षेत्रात एकूण १६ सहस्र वीजेचे दिवे लावण्यात आले आहेत. सौरऊर्जेद्वारे घाट, गर्दीची ठिकाणे येथे वीज चालू होईल, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.
अद्यापही अडीच लाख वीजजोडण्या प्रलंबित !
वर्ष २०१९ मध्ये झालेल्या अर्धकुंभमेळ्याच्या वेळी साडेतीन लाख वीजजोडण्या देण्यात आल्या होत्या. अद्याप काही आखाड्यांचे तंबू उभारण्याचे काम चालू आहे. तंबू उभारल्यानंतर वीजपुरवठा देण्यात येतो. अद्यापही अडीच लाख वीजजोडण्या प्रलंबित आहेत. वीजजोडणीचे काम युद्धपातळीवर चालू आहे, असे गुप्ता म्हणाले.
वीजखांबांवरील ‘क्यू.आर्. कोड’द्वारे तक्रार करता येणार !विशेष म्हणजे या कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक वीजेच्या खांबावर ‘क्यू.आर्. कोड’ लावण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील कॅमेर्याने हा ‘कोड’ स्कॅन केल्यास भ्रमणभाषमध्ये तक्रारीचा अर्ज (फॉर्म) उघडला जातो. त्यावरून कुंभमेळ्यातील कोणत्याही भागातून वीजेविषयीची तक्रार तात्काळ करता येणार आहे. या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र्य ‘पोर्टल’ सिद्ध करण्यात आले असून यासाठी विद्युत् विभागाचे अभियंता कार्यरत आहेत. एखाद्या भागातील वीजेच्या खांबावरील ‘क्यू.आर्. कोड’ स्कॅन केल्यास त्या ठिकाणाची माहितीही विद्युत् विभागाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातील नेमक्या कोणत्या भागात वीजेची अडचण आहे, याची माहिती सहजपणे समजणार आहे. |
वीजजोडणी करणार्या कर्मचार्यांकडून अवैधरित्या पैशांची मागणी !
आखाड्यांना वीजपुरवठा करण्यासाठी काही कर्मचारी पैशांची मागणी करत असल्याचे काही आखाड्यांकडून ‘सनातन प्रभात’ला समजली. याविषयी विचारले असता गुप्ता म्हणाले, ‘विद्युत् जोडणी करणारे काही कंत्राटी कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत. हे अशासकीय आहे. याविषयीच्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्तही झाल्या आहेत. याविषयी आखाड्यांच्या प्रतिनिधींना पुरावे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’