‘सनबर्न’ प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याचे प्रकरण
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सवावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात सुनावणी चालू आहे. हे प्रकरण ७ जानेवारी या दिवशी सुनावणीसाठी आले असता मूळ याचिकेत महोत्सवाच्या कालावधीत घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश करण्याची मागणी याचिकादारांनी खंडपिठाकडे केली आहे. खंडपिठाने याचिकादारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना संबंधित अतिरिक्त माहिती याचिकेसमवेत जोडण्यास अनुमती दिली आहे. यासंबंधी आता पुढील सुनावणी ११ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.
सुनावणीच्या वेळी याचिकादारांनी ‘सनबर्न’ महोत्सवाच्या वेळी एका युवकाचा अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचे, तसेच महोत्सवस्थळी ५ जणांच्या विरोधात पोलिसांनी अमली पदार्थ सेवन केल्याचा गुन्हा नोंद केल्याची प्रकरणे गोवा खंडपिठासमोर मांडली.