‘मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी ! – माजीद मेमन

‘केरळ हा छोटा पाकिस्तान झाला आहे’, या मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते माजीद मेमन यांना पोटशूळ !

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते माजीद मेमन

मुंबई – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ‘केरळ हा छोटा पाकिस्तान; म्हणून राहुल गांधींना मते मिळतात !’, असे विधान केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते माजीद मेमन म्हणाले, ‘‘कॅबिनेट मंत्र्याच्या तोंडून अशी विधाने येणे अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यावर टीका झाली; पण कारवाई झाली नाही. ते मुसलमानांच्या विरोधात चुकीचे बोलत आहेत. मुख्यमंत्री काय करत आहेत ? नितेश राणे यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवण्यास मुख्यमंत्री का सांगत नाहीत ?

केरळ हे उच्चशिक्षित राज्य आहे आणि हा माणूस त्याला पाकिस्तान म्हणत आहे. मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घेऊन कारवाई करावी आणि राणे यांना मंत्रीमंडळातून पायउतार होण्यास सांगावे. मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई न केल्यास तेही याला उत्तरदायी असतील.’’

‘आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच रहावे आणि हिंदूंचे संरक्षण व्हावे’, अशी आमची इच्छा ! – नितेश राणे

नितेश राणे

मेमन यांनी केलेल्या विधानांच्या संदर्भात स्पष्टीकरण देतांना नितेश राणे म्हणाले, ‘‘केरळ हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. हिंदूंची घटती लोकसंख्या ही प्रत्येकाला काळजी वाटावी अशी स्थिती आहे. तेथील हिंदूंचे ख्रिस्ती आणि मुसलमान होणे सामान्य झाले आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. मी त्या परिस्थितीची तुलना पाकिस्तानातील हिंदूंसमवेतच्या वागणुकीशी करत होतो. केरळमध्येही अशीच परिस्थिती उद्भवली, तर त्याचा विचार करावा लागेल. ‘आमचे हिंदु राष्ट्र हे हिंदु राष्ट्रच रहावे आणि हिंदूंचे सर्व प्रकारे संरक्षण व्हावे’, अशी आमची इच्छा आहे. परिस्थिती सर्वांना कळण्यासाठी मी केवळ वस्तूस्थिती मांडत होतो. विरोधक आणि काँग्रेस यांना मला चुकीचे सिद्ध करू दाखवावे.’

संपादकीय भूमिका

केरळमधील स्थिती हिंदूंसाठी धोकादायक झालेली असतांना त्याला पाकिस्तानची उपमा दिली, तर त्यात वावगे काय ? आजवर पाकमधील हिंदूंनी जे सहन केले, ते आज केरळमधील हिंदूंच्या वाट्याला येत आहे. केरळच्या या दुरवस्थेवर भाष्य करण्याऐवजी ते सत्य उघड करणार्‍यांच्या विरोधात कारवाईची भाषा करणार्‍यांवरच कठोर कारवाई झाली पाहिजे !