भारत कधीही स्वतःच्या निर्णयांवर इतरांना ‘नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची अनुमती देणार नाही !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांची स्पष्टोक्ती

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मुंबई – भारत कधीही स्वतःच्या निर्णयांवर इतरांना ‘नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची अनुमती देणार नाही आणि कोणत्याही भीतीची पर्वा न करता राष्ट्रहित आणि जागतिक कल्याण यांसाठी जे योग्य असेल ते करेल, अशा स्पष्ट शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी येथे ऑनलाईन उपस्थित रहात विचार मांडले.  कांची कामकोटी पीठाचे ६८ वे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या नावावरून देण्यात येणारा पुरस्कार डॉ. जयशंकर यांनी देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

डॉ. जयशंकर म्हणाले की,

१. जेव्हा भारत जागतिक स्तरावर अधिक खोलवर जोडला जातो, तेव्हा त्याचे परिणाम अधिक खोलवर होतात. भारताच्या समृद्ध वारशातून जग पुष्कळ काही शिकू शकते. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा भारतियांना स्वतःचा अभिमान असेल. भारत तटस्थ रहात असल्यास गैरसमज करू नका. आम्ही तेच करू, जे राष्ट्रहिताचे आहे.

२. बर्‍याच काळापासून आपल्याला ‘प्रगती म्हणजे आपल्या परंपरांचा नकार’ असे शिकवले जात आहे; पण आता लोकशाही बळकट झाल्यामुळे जगाला देशाची नव्याने ओळख होत आहे.

३. भारत एक असाधारण राष्ट्र आहे; कारण तो एक संस्कृती असलेला देश आहे. केवळ आपल्या सांस्कृतिक सामर्थ्याचा पूर्ण उपयोग करून तो जागतिक स्तरावर प्रभाव पाडू शकेल.

४. भारत आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे, जिथे तो विकासाच्या नवीन संधी शोधत आहे. तथापि काही जुन्या समस्या अजूनही शेष आहेत, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.