भाविकांना २० डिसेंबरपासून ऑनलाईन आरक्षण करता येणार !
पुणे – उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे चालू असणार्या कुंभमेळ्यानिमित्त पुणे-मऊ ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. पुणे ते मऊ विशेष रेल्वे (०१४५५) ८, १६ आणि २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता पुणे रेल्वेस्थानकावरून रवाना होणार आहे. इतर रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी आणि भाविकांची मागणी यांमुळे ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. कुंभमेळ्यासाठी सोडण्यात येणार्या विशेष रेल्वेसाठी भाविकांना २० डिसेंबरपासून ऑनलाईन आरक्षण करता येणार आहे. एकूण १८ डब्यांच्या रेल्वेगाडीत वातानुकूलित डबे, सामान्य प्रवाशांसाठी ६ डबे असे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे येथून दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा, खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड असा या विशेष रेल्वेचा मार्ग आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकावर थांबा असणार आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.