महाराष्‍ट्राच्‍या ट्रिलियन डॉलर अर्थव्‍यवस्‍थेचे उद्दिष्‍ट वर्ष २०२८ पर्यंत पूर्ण करू ! – देवेंद्र फडणवीस, मुख्‍यमंत्री

‘वर्ल्‍ड हिंदु इकॉनॉमिक परिषदे’चे मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते उद़्‍घाटन !

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – वर्ष २०२३ मध्‍ये महाराष्‍ट्राचे अर्धी ट्रिलियन डॉलर अर्थव्‍यवस्‍था करण्‍याचे उद्दिष्‍ट पूर्ण झाले आहे. महाराष्‍ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्‍य करण्‍यासाठी विविध विकासांच्‍या धोरणांची कार्यवाही करण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्राची अर्थव्‍यवस्‍था देशातील ट्रिलियन डॉलर एवढी करणार आहोत. वर्ष २०२८ पर्यंत राज्‍याची ट्रिलियन डॉलर अर्थव्‍यवस्‍था करण्‍याचे उद्दिष्‍ट पूर्ण करू, असा विश्‍वास मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केला. वांद्रे येथील जिओ वर्ल्‍ड कन्‍वेंशन सेंटर येथे ‘वर्ल्‍ड हिंदु इकॉनॉमिक परिषदे’चे उद़्‍घाटन १३ डिसेंबर या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत ही परिषद होत आहे.

परिषदेच्‍या उद़्‍घाटन सोहळ्‍याला आमदार मंगलप्रभात लोढा, ‘वर्ल्‍ड हिंदु इकॉनॉमिक फोरम’चे संस्‍थापक स्‍वामी विद्यानंद, अध्‍यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्‍ते पद्मश्री टी.व्‍ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यांसह जगातील विविध क्षेत्रांतील मान्‍यवर उपस्‍थित होते.

या वेळी उपस्‍थितांना मार्गदर्शन करतांना देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच; मात्र भविष्‍यात मुंबई ‘फिनटेक’ची (‘फायनान्‍शिअल टेक्नॉलॉजी’ची) राजधानी होईल. वर्ल्‍ड हिंदु इकॉनॉमिक परिषदेने भारताच्‍या संस्‍कृतीवर आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्‍या तत्त्वांवर आधारित वेगवेगळ्‍या संकल्‍पना मांडल्‍या आहेत. पाश्‍चिमात्‍य संस्‍कृती आणि भारतीय संस्‍कृती यांमध्‍ये मूलभूत अंतर आहे. पाश्‍चिमात्‍य संस्‍कृतीमध्‍ये जो सक्षम आहे, तोच विकास करू शकतो. आपल्‍या संस्‍कृतीमध्‍ये जन्‍मलेला प्रत्‍येक व्‍यक्‍तीला स्‍वत:चा विकास करण्‍याचा हक्‍क आणि अधिकार आहे. भारताच्‍या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्‍क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात ‘तिसरी महासत्ता’ म्‍हणून समोर येत आहे. जगातील लोक म्‍हणत होते की, ‘एवढी मोठी लोकसंख्‍या असलेला देश कशा प्रकारे प्रगती करू शकतो ?’ परंतु देशातील कुशल मनुष्‍यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. आम्‍ही सर्वांना विकासामध्‍ये घेऊन जात आहोत.’’