यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल ! – चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप

१४ ते २३ डिसेंबर या कालावधीमध्‍ये साजरा होणार

सभेला संबोधन करताना चंद्रकांत पाटील

पुणे – पुणे शहर लेखन, वाचन, चिंतन आणि संशोधन यांची प्रयोगशाळा आहे. पुण्‍याच्‍या श्री गणेशोत्‍सवाप्रमाणेच यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल. पुणे पुस्‍तक महोत्‍सवाचे अनुकरण राज्‍यातील सर्व शहरांना करावेसे वाटत आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महोत्‍सव नागपूरमध्‍ये आयोजित करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आहे; मात्र ‘नागपूरचा महोत्‍सव मोठा होणार कि पुण्‍याचा मोठा करायचा ?’ हे आता पुणेकरांनी ठरवायचे आहे, असे आवाहन भाजपचे कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘राष्‍ट्रीय पुस्‍तक न्‍यासा’च्‍या (एन्.बी.टी.च्‍या) वतीने येत्‍या १४ ते २३ डिसेंबर या कालावधीमध्‍ये फर्ग्‍युसन महाविद्यालयाच्‍या प्रांगणात ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ रंगणार आहे. या महोत्‍सवाच्‍या नियोजनाची बैठक ८ डिसेंबर या दिवशी फर्ग्‍युसन महाविद्यालयाच्‍या ‘अंफी थिएटर’ मध्ये पार पडली

अभिनेता प्रवीण तरडे म्‍हणाले, ‘‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ म्‍हणजे पुण्‍याच्‍या मूळ संस्‍कृतीशी जोडलेली नाळ असून, सारस्‍वतांच्‍या पंढरीची नामदेवांची पायरी आहे. पुस्‍तकांच्‍या या कुंभमेळ्‍यातून पुणेकर हे साहित्‍यप्रेमी असल्‍याची हरवलेली ओळख पुन्‍हा प्रस्‍थापित होईल.