मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – दक्षिणेकडील राज्यांमध्ये राजकीय पक्षांमध्ये शत्रुत्व असते. महाराष्ट्रात असे नाही; मात्र मागील ५ वर्षांत महाराष्ट्रात राजकीय संवादाचा अभाव झाला आहे. हा राजकीय संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अभिनंदनपर भाषण करतांना देवेंद्र फडणवीस यांनी वरील उद़्गार काढले.
या वेळी ते म्हणाले, ‘‘चांगला विरोधी पक्ष असणे, हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडतो, त्यांची नोंद घेण्यात येईल. शिस्त हा सभागृहाचा आत्मा आहे. सभागृहात चर्चा होणे महत्त्वाचे आहे. दुर्गम भागातील सर्वसामान्यांचा आवाज आमदारांमुळे सभागृहात पोचतो. ज्या वेळी न्यायपालिका आणि विधीमंडळ यांच्या अधिक्षेपाचा प्रश्न येतो, तेव्हा अध्यक्ष म्हणून विधीमंडळाची बाजू मांडण्याचे काम अध्यक्षांना करावे लागते. त्या वेळी राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन होऊ न देता अध्यक्षांनी भूमिका मांडणे आवश्यक असते. स्वत:ची, दुसर्याची आणि सत्याची अशा सत्याच्या तीन बाजू असतात. अध्यक्षांना सत्याची बाजू मांडावी लागते. त्यासाठी आवश्यक गुणवत्ता आणि संयम अध्यक्ष नार्वेकर यांच्यात आहे. ’’