नवी देहली – ‘पूजा स्थळ कायदा, १९९१’च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या ६ याचिकांवर येत्या १२ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, कथावाचक देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशातील जी पूजा स्थळे होती, ती तशीच ठेवली जातील, असे या कायद्यात म्हटले आहे. केवळ अयोध्येतील बाबरी वादाला यातून वगळण्यात आली होती.
या याचिकांच्या विरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने याचिका प्रविष्ट केली आहे. जमियतचा दावा आहे की, या कायद्याविरुद्धच्या याचिकांवर विचार केल्यास देशभरातील मशिदींविरुद्धच्या खटल्यांचा पूर येईल. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ज्ञानवापी मशिदीची देखभाल करणार्या अंजुमन व्यवस्था मशीद व्यवस्थापन समितीनेही या याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे.