Sri Lankan Navy Arrest Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाकडून ८ भारतीय मासेमारांना अटक : २ नौकाही जप्त

सागरी सीमेचे कथित उल्लंघन केल्याचा आरोप

श्रीलंकेच्या नौदलाकडून ८ भारतीय मासेमारांना अटक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मासेमारांना पकडण्याच्या घटना चालू असून ८ डिसेंबरला सकाळी ८ भारतीय मासेमारांना श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या सीमेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पकडले. तसेच त्यांच्या २ नौकाही जप्त करण्यात आल्या. पकडण्यात आलेले सर्व मासेमार तमिळनाडूतील रामनाथपूरम् येथील रहिवासी आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अशा घटना घडत आहेत. यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी या संदर्भात केंद्र सरकारला ठोस आणि सक्रीय पावले उचलण्याचे आवाहन केले होते. यावर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालय आणि जाफना येथील वाणिज्य दूतावास अटकेत असलेल्या व्यक्तींच्या लवकर सुटकेसाठी अशी प्रकरणे वेगाने आणि सतत घेत आहेत’, असे म्हटले होते; मात्र प्रत्यक्षात अशी कारवाई होऊच नये; म्हणून कोणतीही कृती करण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. (पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडून सातत्याने अशा घटना घडत असतांना भारत सरकार इतकी वर्षे काहीच उपाययोजना करत नसेल, तर हे जनतेला अपेक्षित नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतीय मासेमारांना भारतीय सागरी सीमेचे अंतिम ठिकाण लक्षात येण्यासाठी भारत सरकार सागरात तशी व्यवस्था का निर्माण करत नाही ?