|
मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. १७३ जणांनी सभागृहात आमदारकीची शपथ घेतली; मात्र विरोधकांनी सभात्याग केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला, असा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीमधील निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधीने आमदारकीची शपथ घेतली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सत्तापक्षातील लोकप्रतिनिधींना आमदारकीची शपथ दिली. सकाळी ‘वन्दे मातरम्’ आणि ‘महाराष्ट्र गीत’ झाल्यावर विधीमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ झाला. सभागृहाला प्रारंभ झाल्यावर अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी राज्यपालांनी त्यांना अस्थायी अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र वाचून दाखवले. विधानसभेच्या स्थायी अध्यक्षपदाची निवड ९ डिसेंबर या दिवशी होणार असल्याचा राज्यपालांचा संदेश कालिदास कोळंबकर यांनी वाचून दाखवला. यानंतर सभागृहात आमदारकीच्या शपथ सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम चालू झाला. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी नावांची घोषणा केल्यानुसार लोकप्रतिनिधींनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येऊन आमदारकीची शपथ घेतली. भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी पहिली शपथ घेतली. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ व्या क्रमांकाला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुक्रमे ६ आणि ७ व्या क्रमांकाला शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची शपथ झाल्यावर महायुतीमधील आमदारांनी सभागृहात ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा दिल्या.
भाजपच्या ७ आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ !
भाजपचे आमदार गिरीश महाजन, सीमा हिरे, प्रशांत ठाकूर, सुधीर गाडगीळ, नीतेश राणे, प्रसाद अडसड आणि राम कदम यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली.
१५६ लोकप्रतिनिधींनी घेतली ईश्वरसाक्षीने शपथ !
१७३ पैकी १५६ लोकप्रतिनिधींनी ‘ईश्वरसाक्षी’ने शपथ घेतली. (ईश्वराला साक्षी मानून, तसेच राष्ट्र, धर्म, संस्कृत भाषा आणि संस्कृती जपत शपथ घेणार्या सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन ! – संपादक) १२ जणांनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’, असे म्हटले, तर ५ मुसलमान आमदारांनी अल्लाला साक्ष मानून शपथ घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, धर्मराव अत्राम, नमिता मुंडदा, प्रदीप जैस्वाल आदींनी ‘गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो’, असे म्हणत शपथ घेतली.
५ भाषांमध्ये घेण्यात आली शपथ !
१७३ आमदारांच्या शपथविधीमध्ये १६० जणांनी मराठी भाषेत, ७ जणांनी संस्कृतमध्ये, २ जणांनी हिंदी, तर सिंधी आणि उर्दू भाषेत प्रत्येकी एका लोकप्रतिनिधीने शपथ घेतली. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि भाजपचे पराग शहा यांनी हिंदी भाषेत शपथ घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनी सिंधी, तर समाजवादी पक्षाचे मुफ्ती अहमद खालिद यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली.
११४ आमदार आज शपथ घेणार !
७ डिसेंबर या दिवशी एकूण २०० लोकप्रतिनिधींचा शपथविधी होणार होता. त्यानुसार क्रमांकही निश्चित करण्यात आला होता; मात्र काही लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते, तर काहींना सभागृहात येण्यास विलंब झाला. त्यामुळे १७३ जणांनाच आमदारकीची शपथ देण्यात आली. उर्वरित ११४ आमदारांना उद्या, ८ डिसेंबर या दिवशी आमदारकीची शपथ घ्यावी लागेल. अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना राज्यपालांनी यापूर्वीच शपथ दिली आहे.
मी केवळ हिंदू मतांवर निवडून आलो ! – आमदार नीतेश राणे, भाजप
आमच्यासारखे छत्रपती शिवरायांचे मावळे ३६५ दिवस २४ घंटे लोकांसाठी उपलब्ध असतात. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या प्रेमातून मी तिसर्यांदा निवडून आलो आहे. माझ्या मतदारसंघातील हिंदु समाजाने मला मोठ्या प्रमाणावर मतदान केले. मला एकाही मुसलमानाचे मतदान झाले नाही, असे विधान भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी प्रसारमाध्यमांकडे केले.
क्षणचित्रे
१. पुणे येथील कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजप आमदार हेमंत रासणे प्रथमच सभागृहात आल्यामुळे त्यांना कुठे बसायचे, हे समजले नाही. ते विरोधकांसाठी असलेल्या आसनावर बसले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेऊन आल्यावर हेमंत रासणे यांना घेऊन ते महायुतीच्या आमदारांसाठी असलेल्या आसनावर घेऊन आले.
२. प्रथमच निवडून आलेली अबू आझमी यांची मुलगी सना मलिक यांनी मराठी भाषेत शपथ घेतली.
३. अनेक आमदारांनी शपथविधीच्या वेळी ‘जय श्रीराम’ असा जयघोष, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे स्मरण केले. शिवसेनेच्या काही आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले.
४. शिवसेनेचे वैजापूर मतदारसंघातील आमदार रमेश बोरनारे यांनी शपथ घेण्यापूर्वी साधू-संत आणि जनता जनार्दन यांना वंदन केले. काही आमदारांनी स्वत:च्या संप्रदायातील आराध्य संत आणि देवता यांचे स्मरण केले.
५. भाजपचे आमदार पराग शहा यांच्या पायाला दुखापत झाली असल्यामुळे त्यांना चाकाच्या आसंदीवरून सभागृहात आणण्यात आले. अन्य आमदारांनी त्यांना धरून व्यासपिठावर नेल्यावर त्यांना शपथ घेता आली.
६. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सभागृहात फेटे बांधून आले होते.
७. मिरज येथील भाजपचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी ‘भगवद्गीता’ जवळ बाळगून शपथ घेतली.