देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात अखंड हरिनाम दिंडीचे आगमन !

सनातनच्‍या साधिकांकडून तुळशी वृंदावन आणि ज्ञानेश्‍वरी घेतलेल्‍या वारकरी महिलांचे औक्षण !

विणेकरींच्‍या हातातील विणेला पुष्‍पहार अर्पण करतांना श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी

देवद (पनवेल), ६ डिसेंबर (वार्ता.) – येथील सनातनच्‍या आश्रमात ग्रामस्‍थ मंडळाच्‍या वतीने काढण्‍यात येणार्‍या अखंड हरिनाम दिंडीचे प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही आगमन झाले. हे दिंडीचे २० वे वर्ष आहे. दिंडीच्‍या माध्‍यमातून षडरिपू निर्मूलन आणि व्‍यसन निर्मूलन यांच्‍या संदर्भात कार्य केले जाते. आश्रमात दिंडीचे स्‍वागत करण्‍यात आले. या प्रसंगी आश्रमात हरिद्वार येथील जुना आखाड्याचे मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांचीही वंदनीय उपस्‍थिती लाभली.

विणेकरींचे औक्षण, तसेच पाद्यपूजन सनातनचे साधक श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (आध्‍यात्‍मिक पातळी ६६ टक्‍के) यांनी केले. तुळशी वृंदावन, ज्ञानेश्‍वरी आणि कलश मस्‍तकावर वाहून आणलेल्‍या वारकरी महिलांचे पाद्यपूजन आणि औक्षण सनातनच्‍या साधिका सौ. कृष्‍णाली दुसाने (आध्‍यात्‍मिक पातळी ६० टक्‍के) आणि सौ. स्‍मिता नाणोसकर यांनी केले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत देवद गावातील अनेक वारकरी अभंग गात दिंडीत सहभागी झाले होते. या वेळी आश्रमाच्‍या वतीने वारकरी बांधवांना प्रसाद देण्‍यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनीही उपस्‍थितांना संबोधित केले.

दिंडी आश्रमातून परततांना ज्ञानेश्‍वरी, तुळशी वृंदावन आणि कलश मस्‍तकावर घेऊन सनातनच्‍या साधिका काही अंतरापर्यंत दिंडीत सहभागी झाल्‍या होत्‍या.

क्षणचित्र

दिंडीचे आगमन होणार असल्‍याने आश्रम परिसर गोमयाने सारवलेला होता, याविषयी मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांनी प्रशंसा केली.

अखंड हरिनाम दिंडीचे आगमन ही जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांची कृपा ! – मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज, जुना आखाडा, हरिद्वार

अखंड हरिनाम दिंडीचे येथे आगमन झाले, ही जगद़्‍गुरु तुकाराम महाराजांची कृपाच आहे. आपण भारतात जन्‍मलो, ही आपली पावनभूमी आहे. आता हिंदुत्‍वासाठी आपण सर्वांनी जनजागृती करायला हवी. पंथ किंवा संप्रदाय यांतून बाहेर पडून हिंदुत्‍वाच्‍या रक्षणासाठी पावले उचलायला हवीत. सनातन धर्म हा कधीच नष्‍ट होत नाही. आपल्‍या या हिंदुत्‍वाच्‍या कार्याला माझे आशीर्वाद आणि शुभेच्‍छा आहेत.