आसामच्या भाजप सरकारने उपाहारगृहात गोमांसावर बंदी घातल्यावर आमदार हाफिज रफिकुल इस्लाम यांची टीका !
गोहत्ती (आसाम) – लोकांनी काय खावे आणि काय परिधान करावे याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेऊ नये. भाजप गोव्यात गोमांसावर बंदी घालू शकत नाही; कारण तेथे तसे केल्यास त्यांचे सरकार एका दिवसात पडेल, अशी टीका आसाममधील विरोधी पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे सरचिटणीस आणि आमदार हाफिज रफिकुल इस्लाम यांनी आसाम सरकारवर टीका केली. सरकारने उपाहारगृहांमध्ये गोमांसांवर बंदी घातल्याच्या सूत्रावर ते बोलत होते.
आमदार रफीकुल इस्लाम म्हणाले की, ईशान्येकडील प्रत्येक राज्यात भाजपचे स्वबळावरील सरकार आहे किंवा तो मित्रपक्षांच्या सहकार्याने सरकार चालवत आहे. ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये गोमांस खाल्ले जाते किंवा खाण्यास अनुमती आहे. तिथे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. भाजप तेथे अशा प्रकारचे निर्णय घेत नाही; परंतु आसाममध्ये असे का करत आहे ? आसाममध्ये मुसलमान, ख्रिस्ती, तसेच आदिवासी लोकांच्या अनेक समस्या असून त्या समस्यांवर चर्चा व्हायला हवी. कुणाच्या घरात काय शिजणार, कोण काय घालणार, कोण काय खाणार या सूत्रांवर चर्चा होऊ नये.