नागपूर येथे १ कोटी रुपये नेणारा धर्मांध कह्यात !
नागपूर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील पोलिसांनी साकीर खान हाजी नसीर खान या दुचाकीस्वाराकडून १ कोटी ३५ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी साकीर हा बिन्नी नावाच्या व्यक्तीकडे चालक म्हणून काम करतो.
‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ची स्थापना !
मुंबई – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणार्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (इ.एम्.एम्.सी.) स्थापित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या १ दिवस अगोदर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महत्त्वाच्या घटना, आचारसंहितेचा भंग, कायदा आणि सुव्यवस्था यांविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्यास त्यांची जिल्हा निवडणूक अधिकार्यांच्या वतीने किंवा संबंधित यंत्रणेमार्फत या केंद्राद्वारे तात्काळ नोंद घेतली जाईल आणि त्याचा कृती अहवाल आयोगाकडे पाठवण्यात येईल.
शिवडीत ११५ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान !
मुंबई – शिवडीत ८५ वर्षांवरील ११५ ज्येष्ठ नागरिक आणि १५ दिव्यांग मतदार अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले. मुंबई शहरात २ सहस्र १३७ ज्येष्ठ नागरिक मतदार आणि २१९ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबरपर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाईल.
विदेशी मद्याचा साठा जप्त
नाशिक – येथे सव्वा नऊ लाखांचा विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी पकडला आहे. यामध्ये माजी नगरसेवकाचा समावेश आहे. विदेशी मद्याचे ७ लाख ५२ सहस्र ६४० रुपये किमतीचे ९८ खोके अवैधरित्या साठवून ठेवलेले आढळले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
राज ठाकरे यांनी दोन मिनिटांत भाषण आटोपले !
भिवंडी – येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण होते; पण प्रकृती नाजूक झाल्याचे कारण देत त्यांनी भाषण अवघ्या दोन मिनिटांतच संपवले. तेथून ते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेले.