भाजपचे नेते नितेश राणे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
मुंबई – उद्धव ठाकरे यांनी त्यांची बॅग पडताळणार्या निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांची खिल्ली उडवली होती, तसेच त्यांना अप्रत्यक्षपणे धमक्याही दिल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी १३ नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
नितेश राणे पुढे म्हणाले की, निवडणूक अधिकार्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग पडताळली. त्यानंतर त्यांनी एवढा थयथयाट करण्याचे कारण कळले नाही. निवडणूक अधिकार्यांचे नियुक्ती पत्र मागण्याचा उद्धव ठाकरे यांना काय अधिकार आहे ? आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाचे नियम सर्वांना पाळायचे असतात. निवडणूक पारदर्शक होते कि नाही ?, हे बघणाचा अधिकार त्यांना दिला आहे. देशभरात प्रत्येक ठिकाणी निवडणुकीच्या काळात नेत्यांचे हेलिकॉप्टर किंवा त्यांचे कार्यालय पडताळल्याची असंख्य उदाहरणे आहेत; परंतु संबंधित नेत्यांनी थयथयाट केला नाही. मग उद्धव ठाकरे असे नाटक का करतात? जो नियम अन्य नेत्यांना लागू आहे, तोच ठाकरे यांनाही लागू असणार आहे.’’