वॉशिंग्टन – येमेनच्या हुती बंडखोरांनी नुकतेच बाब अल-मंडेब जलमार्गावर अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण केले; मात्र अमेरिकन युद्धनौकांनी हे आक्रमण पतरवून लावले, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली.
१. अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते मेजर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, हुती बंडखोरांनी किमान ८ ड्रोन, ५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ३ क्रूझ क्षेपणास्त्रे यांद्वारे आक्रमण केले; मात्र या आक्रमणात अमेरिकेचा एकही सैनिक मारला गेला नाही किंवा घायाळ झाला नाही. ते म्हणाले की, अमेरिकेच्या युद्धनौकांनी या आक्रमणाचा यशस्वीपणे प्रतिकार केला.
२. हुती बंडखोरांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने त्यांच्या शस्त्रे साठवण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले.
३. अमेरिकेने या प्रदेशात त्याच्या सैनिकांची संख्या आणखी वाढवली असून हुतीच्या कारवाया रोखण्यासाठी हवाई आक्रमणाचा वापर केला आहे.