Freedom Fighter Bhagat Singh : लाहोर (पाकिस्तान) येथील चौकाला भगतसिंह यांचे नाव न देण्याचा उच्च न्यायालयाचा  निर्णय

भगतसिंह क्रांतीकारक नाही, तर आतंकवादी असल्याचा उल्लेख !

लाहोर (पाकिस्तान) – येथील शादमान चौकाला क्रांतीकारक भगतसिंह यांचे नाव देण्याची योजना पाकिस्तान सरकारने रहित केली आहे. चौकात भगतसिंह यांचा पुतळाही बसवला जाणार नाही. लाहोर उच्च न्यायालयात एका निवृत्त सैन्याधिकार्‍याच्या टिप्पणीनंतर ही योजना रहित करण्यात आली.

पंजाब प्रांतीय सरकारने उच्च न्यायालयाला दिलेल्या उत्तरात असेही म्हटले आहे की, आजच्या व्याख्येनुसार भगतसिंह स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर आतंकवादी होते. त्यांनी एका ब्रिटीश पोलीस अधिकार्‍याची हत्या केली होती आणि या गुन्ह्यासाठी त्यांच्या २ साथीदारांसह त्यांना फाशी देण्यात आली होती. भगतसिंह यांच्यावर मुसलमानांविषयी प्रतिकूल भावना असलेल्या धार्मिक नेत्यांचा प्रभाव होता. एखाद्या ठिकाणाला नास्तिकाचे नाव देणे पाकिस्तानमध्ये मान्य नाही आणि इस्लाममध्ये मानवी मूर्तींना मनाई आहे. त्यामुळे चौकचे नाव पालटून पुतळा बसवणे चुकीचे आहे.

१. ‘भगतसिंह मेमोरियल फाऊंडेशन’चे अध्यक्ष इम्तियाज रशीद कुरेशी यांनी लाहोर उच्च न्यायालयात अवमान याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती.

२. विशेष म्हणजे भगतसिंह फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांना कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर इस्लामी विचारधारा आणि पाकिस्तानी संस्कृती यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला. या स्वयंसेवी संस्थेवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • पाकमध्ये बसून भारतात खलिस्तानी कारवाया करणार्‍यांना हे मान्य आहे का ?
  • पाकमध्ये आतंकवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक, तर क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवले जाते, यावरून त्याची मानसिकता लक्षात येते !