Shankaracharya On Muslims In Mahakumbh : कुंभमेळ्यात मुसलमानांचा कोणताही व्यवसाय नाही आणि त्यांनी मागणीही केलेली नाही ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचा दावा

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

नवी देहली – मुसलमानांचे मक्का हे सर्वांत मोठे तीर्थक्षेत्र आहे. तेथे मुसलमानेतरांना ४० कि.मी. आधी थांबवले जाते. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात मुसलमानांचा कोणताही व्यवसाय नाही आणि मुसलमानांनीही तशी मागणी केलेली नाही. राजकीय पक्षांनी या संदर्भात विरोधात वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे, असा दावा ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतांना केला. ‘बांगलादेशातील हिंदूंची खरी स्थिती जाणून घेण्यासाठी एक शिष्टमंडळ लवकरच बांगलादेशला जाणार आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

शंकराचार्यांनी मांडलेली सूत्रे –

योगी आदित्यनाथ यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, तर मी त्यांचा सेवक होईन !

आम्हाला काश्मीरच्या मुसलमानांनी सांगितले होते की, तुम्ही गोहत्येच्या विरोधात कठोर कायदा करा. गोहत्येवर बंदी घालण्यासाठी आम्हाला मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडूनही पाठिंबा मिळतो. जर योगी आदित्यनाथ सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, तर सर्व काही योगींच्या नावाने केले जाईल. आमचा मठही त्यांच्या नावाने करून मी त्यांचा सेवक होईन.

सध्या कोणताही पक्ष हिंदूंचा नाही !

धर्मनिरपेक्षतेची शपथ राज्यघटनेच्या वतीने घेतली जाते; परंतु समोर आल्यावर ‘आमचा हिंदूंचा पक्ष आहे’ असे म्हटले जाते. ‘आमचा पक्ष हिंदूंचा आहे’, असे  प्रतिज्ञापत्राद्वारे कुणीही म्हटले नाही. पक्षाचे दुहेरी स्वरूप आहे. सध्या कोणताही पक्ष हिंदूंचा नाही.