PM on Article 370 : जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस खरी राज्यघटनाद्रोही ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

नाशिक, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – काँग्रेसनेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू केली नाही. कलम ३७० द्वारे काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना लागू करण्यामध्ये भिंत उभी केली होती. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू झाली. पुन्हा कलम ३७० कलम लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत गदारोळ केला. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यावर देशातील सर्व नागरिकांना आनंद झाला; परंतु राज्यघटना आणि देश यांविषयीच्या भावना यांंची काँग्रेसला पर्वा नाही. जम्मू-काश्मीरमध्ये भारताची राज्यघटना लागू न करणारी काँग्रेस हीच खरी राज्यघटनाद्रोही आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील सार्वजनिक सभेत केली.

पंतप्रधान पुढे म्हणाले की,

१. काँग्रेसचे नेते केवळ दाखवण्यासाठी रिकाम्या पानांची राज्यघटना घेऊन फिरतात. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवणे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांत मोठी श्रद्धांजली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवल्यावर सर्व देशवासियांना आनंद झाला; मात्र काँग्रेस आणि तिचे सहकारी पक्ष यांच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागले.

२. काँग्रेसच्या काळात देशात अनेक घोटाळे झाले. काँग्रेसची सत्ता आल्यास पुन्हा घोटाळे वाढतील. ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तेथे सरकार चालवण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे काँग्रेसने कर वाढवून जनतेकडून वसुली चालू केली आहे. घोटाळ्यांमुळे नागरिकांनी काँग्रेसला देशात पराभूत केले.

३. सद्यःस्थितीत काँग्रेस ‘ऑल इंडिया’ राहिली नाही. काँग्रेस परजीवी झाली आहे. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आदी राज्यांमध्ये काँग्रेसला अन्य पक्षांच्या साहाय्याने निवडणूक लढवावी लागते.

४. महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची संपूर्ण देशात चर्चा आहे. या योजनेचा लाभ महिलांना होत आहे; मात्र काँग्रेस या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेली आहे. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या सन्मानासाठी ही योजना आणली आहे.

५. मराठी ही अभिजात (उच्च) भाषेच्या दर्जासाठी पहिल्यापासूनच पात्र होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानाला पुढे नेले.

एकत्र आहोत; म्हणून सुरक्षित आहोत !    

सत्ता मिळावी, यासाठी काँग्रेसने कायमच इतर मागासवर्गियांमध्ये फूट पाडली. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनी इतर मागासवर्गीय समाजात फूट पाडण्याचे काम केले. समाजात फूट पाडून सत्ता प्राप्त करणे, हीच काँग्रेसची नीती आहे. इतर मागासवर्गीय समाज संघटित झाल्यामुळेच काँग्रेसचे बहुमताचे सरकार येणे बंद झाले. यासाठीच काँग्रेस समाजात फूट पाडत आहे. त्यामुळे ‘एकत्र आहोत, तर सुरक्षित आहोत’, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने वीर सावरकर यांच्यावरील टीका थांबवली !

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘वीर सावरकर म्हणजे महाराष्ट्राचा गौरव आणि आमचे प्रेरणास्थान आहेत. काँग्रेसचे नेते मात्र महाराष्ट्रात येऊन वीर सावरकर यांचा अवमान करतात. काँग्रेसच्या काही नेत्यांनी ‘महाराष्ट्रात निवडणूक जिंकायची असेल, तर वीर सावरकर यांना शिव्या देणे बंद करावे’, असे सांगितले आहे. माझे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान आहे की, वीर सावरकर यांच्या देशासाठी केलेल्या त्यागाविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची प्रशंसा करून दाखवावी. वीर सावरकर यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचे काँग्रेसला मूल्य नाही.’’