Jaishankar On Kashmir Issue : काश्मीरच्या प्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांत गेल्यावर पाश्‍चात्त्य देशांनी आक्रमणाला वादाचे स्वरूप दिले !

  • भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची कठोर टीका !

  • ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, ब्रिटन आणि अमेरिका यांचे नाव घेऊन केली टीका !

नवी देहली – भारतातील जम्मू-काश्मीर आणि लडाख हे प्रदीर्घ काळापासून परकीय शक्तीच्या बेकायदेशीर नियंत्रणाखाली आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर सर्वाधिक काळ काश्मीरवर दुसर्‍या देशाचे नियंत्रण राहिले आहे. वर्ष १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या २ महिन्यांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर आणि लडाख यांच्या काही भागांवर आक्रमण करून त्यांवर नियंत्रण मिळवले. त्याच वेळी वर्ष १९५० आणि १९६० या दशकांत चीनने या भागावर नियंत्रण मिळवले. आम्ही यातील एका आक्रमणावरून संयुक्त राष्ट्रांकडे गेलो होतो. त्याचे रूपांतर वादात करण्यात आले. आक्रमणकर्ता आणि पीडित दोघांनाही समान दर्जा देण्यात आला. दोषी पक्ष कोण होते ? ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, ब्रिटन आणि अमेरिका. हे देश या आक्रमणाच्या संदर्भातील चुकीच्या माहितीत सहभागी आहेत. खरा आक्रमणकर्ता पाकिस्तान असतांना भारताने संयुक्त राष्ट्रांकडे केलेल्या आवाहनाला दोषी ठरवण्यात आले, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांसह पाश्‍चात्त्य देशांवर कठोर टीका केली. ते येथील आयोजित ‘रायसीना डायलॉग्स’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते.

अफगाणिस्तानवर भाष्य करतांना जयशंकर यांनी पाश्‍चात्त्य देशांच्या विसंगत वृत्तीवरही टीका केली. ते म्हणाले की, दोहा (कतार) आणि ओस्लो (नॉर्वे) येथील परिषदांमध्ये ज्या तालिबानी नेत्यांचे स्वागत झाले होते, त्यांनाच आता अफगाणिस्तानातील बिघडत्या परिस्थितीसाठी दोषी ठरवले जात आहे. एकेकाळी आतंकवादी मानले जाणारे तालिबान आता ‘सूट’ आणि ‘टाय’ यांमध्ये कसे आहेत ? तरीसुद्धा त्यांना एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंता म्हणून पाहिले जाते.

संपादकीय भूमिका

 भारताने आता थेट कारवाई करून काश्मीरमुक्त करणे आवश्यक झाले आहे, असेच जयशंकर यांना सांगायचे आहे !