|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा आणि भारतातून पसार झालेला झाकीर नाईक काही आठवडे पाकिस्तानच्या दौर्यावर होता. या दौर्यात त्याने काही आक्षेपार्ह विधाने केल्याने पाकमध्ये त्याच्यावर टीका झाली. आता पाकिस्तानच्या ‘सिनोड’ चर्चचे अध्यक्ष असणारे बिशप (वरिष्ठ पाद्री) डॉ. आझाद मार्शल यांनी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना पत्र लिहून झाकीर नाईक याच्याकडून ख्रिस्त्यांविषयी करण्यात आलेल्या विधानावरून चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वी पाकिस्तानी मुसलमानांनीही झाकीर याला विरोध केला होता.
डॉ. आझाद मार्शल यांनी पत्रात म्हटले आहे की,
१. झाकीर नाईक याच्या सार्वजनिक भाषणांनी आमच्या समुदायाला खूप त्रास झाला आहे; कारण त्यांनी उघडपणे आमच्या विश्वासाच्या, आमच्या पवित्र ग्रंथांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपमानित करणारे आणि पाद्रयांना कमी लेखणारी विधाने केली. झाकीर याच्या वक्तव्यामुळे केवळ धार्मिक अपमान झाला नाही, तर सर्व पाकिस्तानींचा राष्ट्रीय गौरव अल्प केला.
२. झाकीर याच्या टिप्पण्यांबद्दल सरकारने खेदाची औपचारिक क्षमा न मागितल्यमुळे ख्रिस्ती समुदायाला जाणवलेली असुरक्षिततेची भावना आणखी तीव्र झाली आहे. सरकारकडून धार्मिक सलोखा राखण्याचे वारंवार आश्वासन दिले जाते. झाकीरने खुल्या मंचांवर टिप्पणी केली, जिथे आमच्या धर्मगुरूंना आणि विद्वानांना त्यांच्या चुकीच्या मतांना अन् माहितीला योग्य प्रतिसाद देण्याची किंवा दुरुस्त करण्याची संधी दिली गेली नाही.
३. पाकिस्तानचे नागरिक म्हणून अल्पसंख्यांकांना घटनेच्या कलम २० अंतर्गत मूलभूत अधिकारांची हमी आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘प्रत्येक नागरिकाला स्वतःचा धर्म स्वीकारण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार असेल.’
डॉ. मार्शल यांनी राष्ट्रपती झरदारी यांना हे राज्यघटनात्मक अधिकार कायम ठेवण्यासाठी आणि कोणत्याही व्यक्तीकडून उल्लंघन होणार नाही, याची निश्चिती करण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचे आवाहन केले.
संपादकीय भूमिकाझाकीर नाईक याची मानसिकता पाकिस्तान्यांनाही समजली, हे चांगले झाले. त्यामुळे झाकीर याचा मुखवटा उघड झाला आहे. झाकीर जगात कुठेही गेला, तरी त्याला आता मुसलमान महत्त्व देणार नाहीत आणि आता ख्रिस्ती राष्ट्रेही विरोध करतील ! |