‘स्पाइस जेट’ आस्थापनाचा दायित्वशून्य कारभार !
मुंबई – ‘स्पाइस जेट’ आस्थापनाचे मुंबई ते अयोध्या हे विमान मुंबई विमानतळावरून १६ ऑक्टोबरला दुपारी २.४५ वाजता उड्डाण करणार होते. आस्थापनाने ‘विमान दुपारी २.३० वाजता उड्डाण करेल’, असा संदेश प्रवाशांना पाठवला; पण दुपारी २.१० वाजता तेथे कर्मचार्यांकडून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी चौकशी केली, तेव्हा आस्थापनाने ‘विमान दुपारी ४.३० किंवा ५ वाजता सुटेल किंवा त्याहीपेक्षा विलंब होईल. कुणाला तिकीटाचा परतावा (रिफंड) हवा असल्यास घेऊ शकता’, असे सांगितले. काही वेळाने ‘विमानात काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे सायंकाळी ५.३० वाजता विमान सुटेल’, असे सांगण्यात आले.
प्रवाशांनी याविषयी उद्घोषणा करण्यास सांगितले; पण आस्थापनाने तसे केले नाही. काही वेळाने ‘सायंकाळी ६ वाजतील. त्याहीपेक्षा विलंब झाल्यास आम्ही प्रवाशांच्या रात्रीच्या रहाण्याची व्यवस्था करू’, असेही सांगण्यात आले. ‘विमानात बिघाड असेल, तर पर्यायी विमानाची व्यवस्था करा’, असे प्रवाशांनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की, आमच्याकडे दुसरे विमान उपलब्ध नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंतही हे विमान सुटले नव्हते. मुंबईसारख्या मोठ्या विमानतळावर ‘स्पाइस जेट’ची अन्य पर्यायी व्यवस्था दिसून न आल्याने प्रवासी संतप्त झाले होते. प्रवाशांना संपूर्ण प्रकारामुळे पुष्कळ मनस्ताप झाला. ‘स्पाइस जेट’ने सर्व प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था मात्र केली.
संपादकीय भूमिकाखासगी आस्थापनांचा मनमानीपणा जाणा ! यावरून ‘खासगी आस्थापनांच्या कारभारावर सरकारी नियंत्रण असणे आवश्यक किती आवश्यक आहे ?’, हे लक्षात येते ! |