RSS Chief Appeals Hindus : हिंदूंना स्‍वतःच्‍या सुरक्षेसाठी मतभेद आणि वाद नष्‍ट करून संघटित व्‍हावे लागेल !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

बारां (राजस्‍थान) – स्‍वतःच्‍या सुरक्षेसाठी हिंदु समाजाला भाषा, जात आणि प्रांत यासंदर्भातील मतभेद अन् वाद नष्‍ट करून संघटित व्‍हावे लागेल. असा समाज निर्माण व्‍हायला हवा, ज्‍यात संघटन, सद़्‍भावना आणि आत्‍मीयता यांचा भाव असेल, असे आवाहन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे रा.स्‍व. संघाच्‍या स्‍वयंसेवकांच्‍या संमेलनात केले.

प.पू. सरसंघचालक पुढे म्‍हणाले की, ‘हिंदु’ शब्‍द पुढे आला असला, तरी आपण येथे (भारतात) प्राचीन काळापासून रहात आहोत. हिंदू सर्वांना स्‍वीकारतात आणि संवादातून एकता अन् सद़्‍भावनेने जगतात. समाज केवळ व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंब यांनी बनवलेला नाही, तर एक व्‍यापक दृष्‍टीकोन आहे. संघाचे कार्य यंत्रासारखे नाही, तर विचारांवर आधारित आहे. संघाची मूल्‍ये गट नेत्‍यांपासून ते स्‍वयंसेवक आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांपर्यंत सर्वांवर परिणाम करतात.

भारत हिंदु राष्‍ट्र आहे !

प.पू. सरसंघचालक म्‍हणाले की, जगामध्‍ये भारताची प्रतिष्‍ठा त्‍याच्‍या शक्‍तीवर अवलंबून आहे. जेव्‍हा एखादे राष्‍ट्र बलवान असते, तेव्‍हा तेथील स्‍थलांतरितांची सुरक्षाही सुनिश्‍चित केली जाते. भारत हिंदु राष्‍ट्र आहे आणि प्राचीन काळापासून येथे रहाणारे सर्व लोक या अस्‍मितेशी जोडलेले आहेत. हिंदू म्‍हणजे सर्वांना आलिंगन देणारे आणि सर्वांना स्‍वीकारणारे. हिंदूंचा विश्‍वास आहे की, आम्‍हीही योग्‍य आहोत आणि तुम्‍हीही (अहिंदू) तुमच्‍या जागी योग्‍य आहात.